चिपळूण : डेरवण येथे सुरू असलेल्या ११व्या डेरवण यूथ गेम्समधील कबड्डी स्पर्धेत १४ वर्षांखालील गटात जिजामाता सांगली आणि शिवतेज सातारा यांनी तर १८ वर्षांखालील गटात अक्षय, चिपळूण व मातोश्री, पुणे या संघांनी अनुक्रमे मुले व मुली गटात विजेतेपद पटकावले. दोन दिवस चाललेल्या कबड्डी स्पर्धेत दोनही गटात मिळून एकूण ३७ संघांनी सहभाग नोंदवला. उपांत्य फेरीपासून सर्वच सामने रंगतदार आणि चुरशीचे झाले.
१४ वर्षांखालील मुलांच्या गटात जिजामाता, सांगली संघाने ओम स्पोर्टस्, चिपळूण संघावर विजय मिळवत विजेतेपद पटकावले. तर राजमुद्रा, संभाजीनगर संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. १४ वर्षांखालील मुलींच्या गटात शिवतेज, सातारा विरुद्ध महेशदादा लांडगे, पुणे संघातील अंतिम सामना अत्यंत चुरशीचा झाला. यात शिवतेजने निसटती आघाडी घेत विजेतेपद पटकावले. बारामतीच्या शारदा स्पोर्टस संघाला द्वितीय क्रमांक मिळाला.
१८ वर्षांखालील मुलांच्या गटात बलाढ्य अक्षय, चिपळूण संघाने रोहा, रायगड संघावर सहज मात करत या वर्षीचे विजेतेपद पटकावले. उपात्य सामन्यात अक्षय संघाकडून पराभूत झालेला केदारनाथ, चिपळूण संघ तिसऱ्या क्रमांकवर राहिला. मुलींच्या गटात मातोश्री, पुणे आणि शिवराज उदय, सातारा यांच्यात अंतिम सामना झाला. मातोश्रीच्या अनुभवी खेळाडूंनी सहज विजय मिळवत विजेतेपद संपादन केले. चिपळूणच्या स्वराज्य स्पोर्टस संघाने तिसरे स्थान राखले. चारही गटातील प्रथम तीन क्रमांकांच्या संघांना रोख रक्कम व चषक देऊन गौरवण्यात आले.
१४ व १८ वर्षाखालील गटात वैयक्तिक पुरस्काराचे मानकरी
अनुक्रमे उत्कृष्ट चढाई : नैतिक सावंत ओम स्पोर्टस्, शर्वरी पाटील – पुणे, आदित्य सिंग रायगड, ईश्वरी कानडे – सातारा. उत्कृष्ट बचाव : श्रीप्रसाद खडके सांगली, सई इंगळे – सातारा, तनिष राणे – चिपळूण, समृद्धी पाटील पुणे; तर अष्टपैलू खेळाडू म्हणून रविराज माने – सांगली, भैरवी इंगळे सातारा, रितेश बंगाल – चिपळूण, अपेक्षा सावंत पुणे यांना रोख रकमेसह चषक देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:28 PM 24/Mar/2025














