रत्नागिरी : शहरातील हिंदू कॉलनी येथे १६ वर्षीय युवतीला गेली तीन वर्षे वारंवार त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माय-लेकावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय विजय यादव आणि त्याची आई सुवर्णा विजय यादव (दोन्ही मूळ रा. पाली, सध्या रा. वसंत प्रिया अपार्टमेंट, हिंदू कॉलनी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत.
ही घटना शनिवार २२ मार्च रोजी रात्री १०.३५ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन्ही संशयितांविरोधात पीडितेच्या आईने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, सन २०२३ पासून ते अद्यापपर्यंत संजय यादव हा पीडितेला वारंवार त्रास देउन तू माझ्याकडे राहिली नाहीस तर मी तुला ठार मारुन टाकीन व मी आत्महत्या करेन तसेच तू पालीला आपल्या आईकडे रहायला गेलीस तर तुझ्या आई-वडिलांना आणि भावाला मारुन टाकेन, अशी धमकी देउन मारहाण करायचा. तर संजयची आई सुवर्णा यादव ही पीडितेला घरातील भांडी घासण्याची वगैरे कामे सांगत असे व ते काम नाही केले तर तिला मारहाण करत असे.
दरम्यान, सततच्या त्रासाला कंटाळल्याने आपल्या मुलीने गळफास घेत आत्महत्या केल्याचे पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली पाटील करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:20 AM 25/Mar/2025














