रत्नागिरीतील सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला डीआरडीओच्या निवृत्त शास्त्रज्ञांची भेट

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील सोमेश्वर येथे सुरू असलेल्या सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेला नुकतीच पुण्याहून आलेल्या डीआरडीओच्या निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. नगरकर यांनी भेट दिली. या गोशाळेत रत्नागिरी शहरातील भटक्या आणि बेवारस गाई-गुरांची व्यवस्था करण्यात आली असून, त्यांच्या देखभालीची पद्धत आणि संचालनाची माहिती जाणून घेण्यासाठी डॉ. नगरकर यांनी हा दौरा केला.

सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळा ही सामाजिक उपक्रमांचे एक महत्त्वाचे केंद्र बनली आहे. या ठिकाणी भटक्या गाई-गुरांना आश्रय देण्याबरोबरच त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली जाते. डॉ. नगरकर यांनी गोशाळेची संपूर्ण पाहणी केली आणि येथील व्यवस्थापनाची प्रशंसा केली. त्यांनी गोशाळेतील गाई-गुरांच्या आरोग्याबाबत आणि त्यांच्या देखभालीबाबत सविस्तर माहिती घेतली. याशिवाय, या प्रकल्पांतर्गत कार्यरत असलेल्या गोविज्ञान केंद्र, वृद्धाश्रम, योग व निसर्गोपचार केंद्र तसेच प्रस्तावित गुरुकुल या उपक्रमांबाबतही त्यांनी माहिती जाणून घेतली.

भेटीअंती बोलताना डॉ. नगरकर म्हणाले, “हा प्रकल्प समाजासाठी अत्यंत उपयुक्त आणि लोककल्याणकारी आहे. अशा प्रकारची कामे समाजात अधिकाधिक झाली पाहिजेत. मी स्वत: या प्रकल्पाशी कायमस्वरूपी जोडले जाण्याचा मानस आहे आणि याला माझा पूर्ण पाठिंबा राहील.” त्यांच्या या उद्गारांनी उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण झाला.

या प्रसंगी सोमेश्वर शांतीपीठ विश्वमंगल गोशाळेचे संचालक आणि कार्यकर्ते यांच्यासह श्री. विनायक हाथखंबकर, श्री. रवींद्र इनामदार, श्री. रहाटे, श्री. पाटील, श्री. विलास सावंत आणि श्री. राजेश आयरे उपस्थित होते. त्यांनी डॉ. नगरकर यांचे स्वागत केले आणि गोशाळेच्या कार्याबाबत त्यांना सविस्तर माहिती दिली.

Shiva optical

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 25-03-2025