संगमेश्वर तालुक्यात विशेष बाल आरोग्य तपासणी मोहीम

देवरूख : महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाचा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विशेष आरोग्य तपासणी मोहिमेला संगमेश्वर तालुक्यात सुरुवात झाली आहे. या मोहिमेचे उद्घाटन देवरूख शाळा क्र. ४ येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीप माने यांच्या हस्ते करण्यात आले.

या मोहिमेत सर्व शाळा व अंगणवाडीमधील सर्व मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारावर उपचार, विशेष आजाराच्या मुलांना संदर्भ सेवा दिल्या जाणार आहेत. तर जन्मजात व्यंग, कमतरता, आजार शोधून त्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संगमेश्वर तालुक्यात १ ते ३१ मार्च या कालावधीत शाळा व अंगणवाडी येथे बालकांची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

तपासणी पथकामध्ये डॉ. आस्माबेगम बैरागदार, डॉ. प्राजक्ता खातू, डॉ. पूनम पावरी, डॉ. संदेश पवार, डॉ. विशाल शिर्के व फार्मासिस्ट, आरोग्य सेविका यांच्यामार्फत शाळा व अंगणवाडी केंद्र या ठिकाणी आरोग्य तपासणीचे नियोजन करण्यात आले.

या आरोग्य तपासणी मोहिमेमध्ये दि. १ मार्चपासून १९ मार्च देवरूख परिसरातील सर्व शाळा, २० मार्चपर्यंत बुरंबी हायस्कूल, विघ्रवली वरचीवाडी, २१ मार्च रोजी जि. प. प्रा. शाळा सांगवे, कळंबस्ते हायस्कूल, २४ मार्च रोजी धामापूर पिर हायस्कूल येथे तपासणी झाली. दि. २५ मार्च रोजी आंगवली हायस्कूल, घाटीवळे हायस्कूल २६ मार्च रोजी साखरपा जाधववाडी पूरे तर्फे देवळे, जांभवाडी येथील अंगणवाडी व शाळांमध्ये आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

या मोहिमेत तालुक्यातील पालकांनी आपल्या पाल्यांची आरोग्य तपासणी करून घ्यावी, असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोविंद मोरे यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:18 AM 25/Mar/2025