Breaking : रत्नागिरी तालुक्यात अवकाळी पावसाची हजेरी; गणपतीपुळे आणि संगमेश्वरात जोरदार सरी

रत्नागिरी, दि. २५ मार्च २०२५ – रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे परिसरात आज अवकाळी पावसाने हजेरी लावली. निवेंडी गावात विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली असून, हवामान खात्याने पुढील काही दिवसांत आणखी पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातही मुसळधार पावसाने जोर धरला असून, विजांच्या गडगडाटासह जोरदार सरी कोसळल्या आहेत.

दुपारपासूनच गणपतीपुळे परिसरात आकाश ढगांनी भरून आले होते. काही वेळातच विजांचा कडकडाट आणि पावसाच्या सरींनी परिसराला झोडपून काढले. निवेंडी गावात पावसाचा जोर वाढल्याने स्थानिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, कोकण किनारपट्टीवर अवकाळी पावसाचे ढग जमा झाले असून, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. या पावसामुळे आंबा पिकावर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. विजांच्या कडकडाटामुळे नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.