मंडणगड : उगवत्या सूर्याच्या सोनेरी किरणांसवे कासवांच्या पिल्लांचा जन्मोत्सव या नैसर्गिक सोहळ्याचे आनंदी क्षण मंडणगड शहरवासीयांनी अनुभवले. यशतेज फाउंडेशन, मंडणगड यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांनी मंगळवारी (ता. २५) वेळास येथे ऑलिव्ह रिडेल कासवांचा जन्मसोहळा पाहिला.
वेळास समुद्रीकिनारी करण्यात हॅचरीत आलेल्या घरट्यामधील अंड्यांतून ३४ पिल्ले बाहेर पडली. त्यांना समुद्रकिनारी सुखरूप सोडण्यात आले. कासवमित्र मोहन उपाध्ये यांनी ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांसह कासव या विषयाची सखोल माहिती दिली. पहाटे साडेचार वाजता शहरातून वेळास किनारी दाखल झालेल्या नागरिकांनी सूर्योदयावेळी हा जन्मसोहळा अनुभवला.
कासवांचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या वेळास या गावी कासव विणीच्या हंगामास सुरवात झाली आहे. यंदा वेळास येथे समुद्रकिनाऱ्यावर ३२ घरट्यामध्ये ३ हजार ५७९ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत. कासवांची पिल्ले अंड्यातून बाहेर पडण्यास सुरवात झाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही या कासवांचा जन्मसोहळा पाहण्यासाठी पर्यटक व अभ्यासकांसाठी अंड्यातून पिल्ले केव्हा बाहेर पडतील याची माहिती स्थानिक व कासवमित्राकडून प्राप्त होत आहे. त्यानुसार वेळास गावात पर्यटक अभ्यासकांची गर्दी वाढत आहे. या पुढील काळात लवकरच कासव महोत्सवाच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.
कासवप्रेमींची गर्दी
कासवांचा जन्मोत्सव पाहण्यासाठी मोठ्या संख्येने कासवप्रेमींनी वेळास समुद्रकिनारी पहाटेपासून गर्दी केली होती. त्यांनी या नैसर्गिक सोहळ्याचा आनंदी क्षण कुटुंबासोबत अनुभवला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:24 PM 26/Mar/2025














