चिपळुणात गुढीपाडवा, ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च

चिपळूण : भारतीय नववर्ष गुढीपाडवा व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर चिपळूण पोलिसांकडून मंगळवारी (दि. २५) शहरात व काही ठिकाणच्या नागरी वस्तीत रूट मार्च काढण्यात आला. यावेळी प्रथमच अग्निशमन व रुग्णवाहिका यंत्रणेचा समावेश करण्यात आला होता. शंभरहून अधिक पोलिस कर्मचारी व सर्व प्रमुख पोलिस अधिकारी यावेळी रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.

महिनाअखेर लागोपाठ येणाऱ्या दोन सणांच्या पार्श्वभूमीवर चिपळुणात जातीय सलोख्याबरोबरच शांतता, कायदा व सुव्यवस्था राहावी, यासाठी चिपळूण पोलिसांकडून सर्वतोपरी दक्षता घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी चिपळूण पोलिस ठाण्यात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती तर आता या संदर्भात नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करून शहरात जातीय सलोखा कायम राहावा, यासाठी रूट मार्चचे आयोजन केले होते.

इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रापासून बाजारपेठ, गोवळकोट रोड आदी परिसरात शंभरहून अधिक पोलिस कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी, रुग्णवाहिका, अग्नीशमन दल आदींसह मंगळवारी सायंकाळी ५.३० वाजता रूट मार्च काढण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:52 PM 26/Mar/2025