लांजा पोलिस ठाण्यासह परिसराला नवा साज

लांजा : लांजा पोलिस ठाण्याच्या परिसरात स्वच्छतेसह करण्यात आलेले सुशोभीकरण आणि रंगरंगोटीमुळे पोलिस ठाण्याचे रूपडे पालटले आहे. त्यामुळे लांजा पोलिस ठाण्याच्या इमारतीने कात टाकली आहे.

शासनाने सर्व कार्यालयांना शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून दिलेला आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र पोलिसांना दिलेल्या सातकलमी कार्यक्रमांतर्गत पोलिस ठाण्यांच्या स्वच्छतेसह त्यांचे सुशोभीकरण करणे, कामांमध्ये सुसूत्रता आणणे आणि ती जलदगतीने करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्या अंतर्गत लांजा शहर पोलिस ठाण्याचा पूर्णपणे कायापालट झाला आहे. लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह पोलिस ठाणे इमारत आकर्षक बनवली आहे.

यामध्ये परिसर स्वच्छ करून इमारतीची रंगरंगोटी, माहिती फलक, जुन्या मुद्देमालाची निर्गती, नागरिकांचे अर्ज तत्काळ मार्गी लावणे, प्रतिबंधात्मक कारवाई ही कामे अधिकारी, अंमलदारांकडून करून घेत पोलिस निरीक्षक बगळे यांनी सातकलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी केली आहे. शासनाच्या या कार्यक्रमांतर्गत लांजा शहर पोलिस ठाणे सजवले आहे. राज्यात नवे सरकार सत्तेवर आल्यानंतर त्यांनी राज्यातील शासकीय कार्यालयांमध्ये सातकलमी कार्यक्रम राबवण्याचा निर्णय घेतला होता.

त्याची अंमलबजावणी प्रत्येक सरकारी कार्यालयाने करणे बंधनकारक केले आहे. पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत केडगे यांच्या मार्गदर्शनाखाली लांजा पोलिस निरीक्षक बगळे यांनी अधिकारी, अंमलदार यांना सातकलमी कार्यक्रमांची अंमलबजावणी करण्यासाठी कामांचे वाटप करून दिले होते. गुन्ह्यातील गाड्या अस्ताव्यस्त पडलेल्या होत्या. त्या गाड्या इमारतीच्या मागील बाजूला ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे दर्शनी भाग पूर्णतः स्वच्छ झाला आहे.

प्रतीक्षागृहात नागरिकांच्या हक्काच्या अधिकारांचे फलक लावले आहेत. दर्शनी भागात निरीक्षक दालनासह पोलिस ठाण्यातील इतर महत्त्वाच्या कक्षांच्या पाटी लावून नामकरण केले आहे. त्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे. दर्शनी भागात झाडे लावली आहेत व इमारतीच्या मागील बाजूला नव्याने पार्किंग केले आहे.

नावीन्यपूर्ण उपक्रमांवर भर
कर्मचाऱ्यांना नवीन कायद्याबाबत ज्ञान, तपासाच्या आधुनिक पद्धती, न्यायालयात गुन्हे कसे सादर करावेत, ई-साक्ष अॅप प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे सॅनिटरी नॅपकिन मशीन व डिस्पोझल मशीनही बसवण्यात आली आहे. तर नागरिकांचे अर्ज तत्काळ निकाली, जुन्या गुन्ह्यांची उकल, प्रतिबंधात्मक कारवाई आदी अंमलदारांकडून करून घेत शंभर टक्के कामाची पूर्तता करण्याचा प्रयत्न बगळे यांनी केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:59 AM 27/Mar/2025