खेड : कोकणात बहुतांश ठिकाणी पावसावर आधारित भातशेती प्राधान्याने केली जाते; मात्र त्याला अपवाद खेड येथील नातूनगर धरणाच्या सिंचन क्षेत्रातील गावे ठरत आहेत. या धरणाचे पाणी शेतीसाठी उन्हाळ्यातही उपलब्ध होत असल्याने भुईमूग व भात लागवड उन्हाळ्यातदेखील केली जात आहे. दुबार पीक मिळत असल्याने येथील काही शेतकरी आता व्यावसायिक शेतीकडे वळत आहेत. नातूवाडी धरणाच्या पाण्याचे योग्य नियोजन केले गेल्यास व शासनाने त्यासाठी कृषी विभागामार्फत पुढाकार घेतल्यास अधिक लागवडीखाली क्षेत्र आणता येईल, अशी परिस्थिती आहे. सद्यः स्थितीत २०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आले आहे.

नातूवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी दोन प्रमुख कालवे असून दोन्हीही कालव्यांमधून शेतीसाठी व बागायतीसाठी पाणी सोडले जाते. डिसेंबरनंतर धरणाच्या पाण्याचा वापर शेतीसाठी करावा लागतो. नातूवाडी धरणाच्या सिंचनक्षेत्रात २०हून अधिक गावे असून, २ हजार ५० हेक्टर क्षेत्र जलसिंचन करण्याची या धरणाची क्षमता आहे.
धरणाच्या पूर्णक्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी शासनाने कृषी विभागामार्फत शेतकरी गट स्थापन करून पाणी वापर समित्याची निर्मिती नातूवाडी धरणाच्या डावा व उजवा कालवा परिसरात येणाऱ्या गावांमध्ये करणे गरजेचे आहे.
सद्यःस्थितीत नातूवाडी, बोरघर, खवटी, उवळे, वावे, आपेडे, कळवणी, भरणे, भडगाव, खोडे, चाकाळे, मुरडे, आंबये, जामगे, शिवतर या गावांच्या परिसरामध्ये २०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे कापती क्षेत्र वगळता काही गावातील शेतकरी आता दुबार भातशेती, कडधान्य शेती घेत असून, काही शेतकऱ्यांनी भातशेतीला पर्याय म्हणून भुईमुगाचीदेखील लागवड केलेली दिसून येत आहे.
नातूवाडी धरणामुळे आम्हाला ऐन उन्हाळ्यातदेखील पिण्याच्या पाण्याची समस्या भासत नाही. उन्हाळ्यात आमच्या पंचक्रोशीतील अनेक जमिनी हिरव्यागार दिसून येतात. – उदयसिंह बोरकर, माजी सरपंच, बोरघर
पावसाळ्यात आम्ही या ठिकाणी भातशेती करतोच; परंतु दरवर्षी नातूवाडी धरणातून शेतीसाठी पाणी सोडले जाते. त्याचादेखील आम्ही पुरेपूर उपयोग करून घेतो. अगदी गेली २५ वर्षे आम्ही या ठिकाणी भुईमुगासह विविध कडधान्य पिके घेतोच; पण उन्हाळी भातशेतीदेखील करत आहोत. आम्हाला चांगले उत्पत्र मिळते आणि आमचा उदरनिर्वाह उत्तम पद्धतीने चालतो. – प्रमोद हंबीर, हंबीरवाडी, कळंबणी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 27/Mar/2025














