राजापूर : दिवटेवाडीमधील ‘ते’ बांधकाम निकृष्ट

राजापूर : शहरातील दिवटेवाडी येथील देवझरी येथे संरक्षक भिंत व देवझरी येथे जा-ये करण्यासाठी बांधण्यात आलेल्या पाखाडीचे बांधकाम सुरू आहे. हे बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असून ते तत्काळ थांबवून त्याची सखोल चौकशी करावी, अशी मागणी दिवटेवाडी येथील ग्रामस्थांनी लेखी निवेदनाद्वारे नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे. दिवटेवाडी येथील ग्रामस्थांनी मुख्याधिकारी यांना दिलेले निवेदन आज पालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव यांनी स्वीकारले.

शहरातील दिवटेवाडी देवझरी येथे बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कातळावर वरचेवर बांधण्यात आलेली आहे. पावसाळ्यामध्ये देवझरी येथे धबधबा वाहत असून, त्याच्या पाण्याचा वेगही मोठ्या प्रमाणात असतो.

त्याचवेळी देवझरी भागामध्ये सर्वत्र नैसर्गिक झरे वाहू लागतात. त्यामुळे कातळावर वरचेवर बांधण्यात आलेली संरक्षक भिंत कोसळण्याची शक्यता आहे.

राजापूर बुरंबेवाडी रोडकडून येणारी देवझरीकडील पाखाडीचे काम पूर्ण झाले आहे; मात्र, ही पाखाडी बांधण्यासाठी वापरण्यात आलेला जांभा दगड मातीवरती बसवण्यात आला आहे. पावसाच्या पाण्यामुळे हा दगड सरकून नुकसान होण्याची शक्यता आहे. संरक्षक भिंत आणि पाखाडीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या कामांची सखोल चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी, अशी मागणी दिवटेवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे पालिकेचे मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 AM 28/Mar/2025