Mhada News : म्हाडा राज्यात वर्षभरात 19,497 घरं बांधणार; 15951.23 कोटींच्या बजेटला मंजुरी

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) सन 2025-2026 च्या अर्थसंकल्पात ‘म्हाडा’च्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत एकूण 19 हजार 497 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून त्यासाठी अर्थसंकल्पात 9202.76 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

म्हाडाचा सन 2024-25 चा सुधारित व सन 2025-2026 चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या सन 2025-2026 च्या 15951.23 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला व सन 2024-25 च्या 10901.07 कोटी रुपयांच्या सुधारित अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाअंतर्गत येत्या आर्थिक वर्षात 5199 सदनिकांची उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी सन 2025-2026 च्या अर्थसंकल्पात 5749.49 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कोकण मंडळाअंतर्गत 9902 सदनिकांची उभारणी करण्याचे उद्दीष्ट असून सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात त्यासाठी 1408.85 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पुणे मंडळाअंतर्गत 1836 सदनिकांचे बांधकाम करण्याचे उद्दीष्ट आहे. त्यासाठी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात 585.97 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच नागपूर मंडळाअंतर्गत 692 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे.त्यासाठी सन 2025-26 च्या अर्थसंकल्पात 1009.33 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मंडळाअंतर्गत 1608 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी 231.10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

नाशिक मंडळाअंतर्गत 91 सदनिका बांधण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी अर्थसंकल्पात 86 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. अमरावती मंडळाअंतर्गत 169 सदनिकांचे बांधकाम करण्याचे प्रस्तावित असून त्यासाठी अर्थसंकल्पात 65.96 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

म्हाडाच्या या नव्या योजनांमुळे राज्यभरात नागरिकांना परवडणारी घरे उपलब्ध होण्याचा मार्ग सुकर होणार आहे.

मुंबई मंडळातर्फे अर्थसंकल्पात वरळी, नायगाव, परळ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास योजनेसाठी 2800 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. जोगेश्वरी पूर्व येथील पीएमजीपी कॉलनी पुनर्विकास प्रकल्पासाठी 350 कोटी रुपये, वांद्रे पश्चिम येथील परिध खाडी पुनर्विकास प्रकल्पासाठी 205 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर येथे सदनिका उभारणीसाठी 573 कोटी रुपये, परळ येथील जिजामाता नगर येथील भूखंडावर मुले व मुलींच्या निवासासाठी वसतिगृह उभारणीसाठी 20 कोटी रुपये, गिरणी कामगारांच्या घरासाठी 57.50 कोटी रुपये, बोरीवली सर्वे क्र. 160 वरील योजनेसाठी 200 कोटी रुपये, संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील पुनर्वसन प्रकल्पासाठी 200 कोटी रुपये, पहाडी गोरेगाव प्रकल्पासाठी 177.79 कोटी रुपये, मालवणी झोपडपट्टी सुधार प्रकल्पासाठी 50 कोटी रुपये, मागाठाणे बोरीवली योजनेसाठी 85 कोटी रुपये, एक्सर बोरीवली तटरक्षक दल योजनेसाठी 30 कोटी रुपये, गोरेगाव सिद्धधार्थ नगर (पत्राचाळ) पुनर्विकास प्रकल्पासाठी 20 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.

कोकण मंडळांतर्गतच्या पाचपाखाडी-ठाणे सावरकर नगर येथे दोन मजल्यांचे हेल्थ केयर सेंटर व निवासी घरकुल योजनेसाठी 15 कोटी रुपये, माजिवाडे-ठाणे विवेकानंद नगर येथे 100 बेडचे वृद्धाश्रम व काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह उभारणीसाठी 30 कोटी रुपये, विरार बोळींज येथे क्लब हाऊस, जलतरण तलाव व भूखंड विकसित करणे कामासाठी 33.85 कोटी रुपये, वर्तकनगर-ठाणे पोलीस वसाहत इमारतींचा पुनर्विकास कामासाठी 90 कोटी रुपये, गोठेघर प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) योजनेसाठी 115 कोटी रुपयांची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

नागपूर मंडळांतर्गत चंद्रपूर विशेष नियोजन प्राधिकरण योजनेसाठी 371.20 कोटी रुपये, टेक्सटाइल पार्क एम्प्रेस मिल योजनेसाठी 350 कोटी रुपये अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:06 31-03-2025