व्हिजन दापोली उपक्रमांतर्गत शिष्यवृत्ती परीक्षेची आता चौथीपासून पूर्वतयारी

गावतळे : पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुक्यातील विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करून घेण्यासाठी ४ थी पासूनच नियोजन केले जात आहे. त्यासाठी शिक्षण विभागाने व्हिजन दापोली उपक्रमांतर्गत व्हीडीएस ४ परीक्षेचे नियोजन केले आहे. त्यामध्ये वर्षभरात शिष्यवृत्ती अभ्यासक्रमाचे नियोजन करून टप्प्याटप्प्याने चाचण्या व परीक्षा घेतल्या जातात. त्या अंतर्गत पूर्वतयारी परिक्षेसाठी यंदा ४थीचे १ हजार १२४ विद्यार्थी पात्र ठरले आहेत.

दापोली तालुका पंचायत समितीने सुरू केलेल्या व्हिजन दापोली उपक्रमांतर्गत ५वी शिष्यवृत्ती परीक्षेची पूर्वतयारी ४थीसाठी व्हीडीएस ४ परीक्षेचे नियोजन केले जाते. वर्षाच्या सुरुवातीला अभ्यासक्रमाचे नियोजन करून चाचण्या व परीक्षा घेतल्या जातात. शेवटी अंतिम परीक्षा घेतली जाते.

७ एप्रिल रोजी अंतिम परीक्षेचे नियोजन दापोली व्हिजन कमिटीने उत्कृष्ट प्रकारे स्पर्धा परीक्षाप्रमाणे नियोजन केले आहे. त्यासाठी केंद्रसंचालक व तंत्रस्नेही शिक्षकांसाठी गिम्हवणे शाळेत कार्यशाळा झाली. यंदा ४थीचे १ हजार १२४ विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र आहेत. त्यामधून ५० विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार केली जाणार आहे. निवडलेल्या विद्यार्थ्यांना पाचवी शिष्यवृत्तीसाठी विशेष मार्गदर्शन केले जाईल. या मुख्य समितीचे सदस्य जयंत सुर्वे यांनी प्रशिक्षणात पीपीटीद्वारे, तर गणेश पवार यांनी एक्सल शीटमध्ये माहिती कशी भरावी, याचे प्रात्यक्षिक दाखवले.

यावेळी मुख्य समितीसह २७ केंद्रांचे संचालक व तंत्रस्नेही शिक्षक उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सांगडे यांच्यासोबत नवनियुक्त विस्तार अधिकारी नजीर वलेले व मेघा पवार यांचे स्वागत-सत्कार, तर मंडणगडमध्ये नव्याने विस्ताराधिकारी शिक्षण म्हणून बदली झालेले मुख्य समिती सदस्य श्रीकांत बापट यांना मुख्य समितीमार्फत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी श्रीकांत बापट म्हणाले, शिष्यवृत्ती परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी शिक्षण विभागाचा सिंहाचा वाटा आहे. नवे पद जरी मिळाले तरीही जुने स्नेहबंध कायम राहतील.

निकोप आणि चांगल्या वातावरणात व्हीडीएस ४ परीक्षा सुरळीत होण्यासाठी नियोजन केले आहे. गुणवत्तेचा हा कार्यक्रम भविष्यात पुढे सुरू राहील यासाठी प्रयत्न चालू आहेत. पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत दापोली तालुका नेहमीच अग्रेसर राहील- रामचंद्र सांगडे, गटशिक्षणाधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:02 PM 05/Apr/2025