चिपळूण : ग्रॅव्हिटी योजनेच्या साठवण टाक्यांचे काम निकृष्ट; नागरिकांचा आक्षेप

चिपळूण : शहरासाठीच्या ग्रॅव्हिटी पाणीयोजनेच्या साठवण टाक्यांची कामे निकृष्ट केली जात आहेत. वाळूऐवजी जाडे ग्रीट वापरले जात असून, लोखंडाला रंग मारण्याची अट असतानाही ते तसेच वापरले जात असल्याची तक्रार खेड येथील नागरिकांनी गुरुवारी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे करत खेड, गोवळकोट व डीबीजे महाविद्यालय परिसरात सुरू असलेली कामे वाचवण्याची मागणी करण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वी १५५.८४ कोटी रुपये खर्चाच्या ग्रॅव्हिटी योजनेच्या शासन मंजुरीचे परिपत्रक निघाल्याने या योजनेच्या कामाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे काही महिन्यांपासून वरील ठिकाणी साठवण टाक्या बांधण्याचे काम सुरू झाले आहे. कंपनीने काम करण्यासाठी स्थानिक ठेकेदाराची नियुक्ती केल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या कामावर नागरिक आक्षेप घेत आहेत. यातूनच गुरुवारी खेड येथील नागरिकांनी नगरपालिकेवर धडक देत मुख्याधिकारी भोसले यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. यात संबंधित ठेकेदार वाळूचा वापर करत नसून जाडे ग्रीट वापरत आहे.

कामाच्या ठिकाणी अभियंते कधीही दिसत नाहीत असा निकृष्ट कामे वेळीच रोखली नाहीत, तर भविष्यात या लाखो लिटर क्षमतेच्या टाक्या कोसळून लगत राहणाऱ्या नागरिकांच्या जीवास धोका होणार आहे. त्यामुळे ही कामे तातडीने थांबवावीत, अशी मागणी तक्रारीत करण्यात आली आहे. यावेळी अनिल हटकर, वैभव आवले, संदीप जागुष्टे, दीपक आंबेकर, मनोहर लवेकर, अशोक बोंडकर, प्रभाकर भोजने, राजेंद्र बोंडकर, सुभाष भोजने, चंद्रकांत मिरगल, अंकुश आवले, मुकुंद वेल्हाळ, आशुतोष माजलेकर आदी उपस्थित होते.

आक्षेपाद्वारे कंपनीला नोटीस काढणार
काम चांगली झाली पाहिजेत, ही तुमची मागणी योग्य आहे, त्यामुळे तुमचे जे जे आक्षेप आहेत त्या आधारे संबंधित कंपनीला तत्काळ नोटीस काढली जाईल. तसेच याची जबाबदारी असलेल्या सांगली कॉलेजकडून आतापर्यंत झालेल्या कामाचे थर्डपार्टी ऑडिट करून घेण्यात येईल, अशी माहिती मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी दिली.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:13 PM 05/Apr/2025