येरडव-राजापूर बस बंद केल्याने प्रवाशांमध्ये संताप

राजापूर : तालुक्याच्या पूर्व भागातून सकाळी गोठने दोनीवडे, चिखलगाव, शीळमार्गे राजापूरकडे येणारी येरडव – राजापूर ही बस चांगले भारमन मिळत असूनदेखील अचानक बंद करण्यात आल्याने या मार्गावरील प्रवाशांसह परिसरातील विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याने राजापूर आगाराच्या कारभाराविरुद्ध प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळी ७ च्या दरम्यान ही बस तालुक्याच्या पूर्व परिसरातून निघते, त्यानंतर ती पाचल, रायपाटण, सौंदळ, चिखलगाव, गोठणे दोनीवडे, शीळ मार्गे राजापूरला सकाळी साडेआठच्या आसपास येते. पूर्व भागातून राजापूरकडे सकाळी येणारी ती पहिली बस असल्याने तिला चांगले भारमान असते.

विशेषतः शालेय तसेच विद्यालय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या बसचा चांगला उपयोग होतो. सौंदळ पट्ट्या मधील चिखलगाव, गोठणे दोनीवडे, शीळ, आदी परीसरातून सकाळच्या वेळी अनेक विद्यार्थी या बसने प्रवास करतात आणि वेळेवर पोचतात. तर सकाळच्या वेळी याच परीसरातून विविध कामानिमित्त राजापूर शहराकडे येणारे अन्य प्रवासी देखील आहेत. या परीसरातील गावांचा दैनंदिन व्यवहारांसाठी राजापूर शहराशी संपर्क असतो.

राजापूर शहरावर त्यांना सदैव विसंबून रहावे लागते. त्या सर्वांना मागील काही वर्षे या बसचा चांगला फायदा होत असतानाच राजापूर आगाराने कोणतेही कारण न देता अचानक ही बस बंद करून सर्वांची गैरसोय केली आहे.

Ratnagiri Khabardar add image

राजापूर एसटी आगाराने अचानक ही बस बंद केल्याने प्रवाशांसह समस्त विद्यार्थी वर्गाची मोठी अडचण झाली आहे. त्या बसनंतर दुसरी बस तत्काळ नसल्याने अनेकवेळा समस्त प्रवाशांचा खोळंबा होतो. बसची वाट पहात बसावे लागते. शाळेसह, विद्यालय आणि महाविद्यालयात पोचायला विलंब होतो.

राजापूर आगाराने चांगले भारमान देणारी बस अशी अचानक बंद करून काय साधले असे संतप्त सवाल उपस्थिती केले जात आहेत. राजापूर आगाराने बंद केलेली ही बस तात्काळ पूर्ववत सुरु केली नाही तर तीव्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा समस्त प्रवाशी वर्गातून देण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:14 AM 07/Apr/2025