रत्नागिरी : त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेसमध्ये प्रवास करणाऱ्या एका महिलेची हँडबॅग आणि रोख रक्कम अज्ञात व्यक्तीने चोरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना दिनांक १३ फेब्रुवारी २०२५ रोजी पहाटे ३.०० ते ५.०० वाजेच्या दरम्यान रत्नागिरी कार्यक्षेत्रात घडली. या प्रकरणी मडगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ३०५ (क) अंतर्गत तपास सुरू आहे.
घटनेचा तपशील
फिर्यादी महिलेनुसार, त्या दिनांक १२ फेब्रुवारी २०२५ रोजी त्रिवेंद्रम राजधानी एक्सप्रेस (गाडी क्रमांक १२४३२) मधून हजरत निजामुद्दीन, दिल्ली येथून गोव्याकडे प्रवास करत होत्या. त्यांचा कोच क्रमांक पी.-१ एच१ आणि सीट क्रमांक ई १३, १४ होता. प्रवास सकाळी ६.३० वाजता सुरू झाला होता. दिनांक १३ फेब्रुवारी रोजी पहाटे रत्नागिरी परिसरात ट्रेन पोहोचली असताना, फिर्यादी झोपेत असताना अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हँडबॅगसह रोख रक्कम चोरली.
चोरीस गेलेला माल
या चोरीत महिलेची हँडबॅग आणि त्यातील मौल्यवान वस्तूंचा समावेश आहे. चोरीस गेलेल्या मालाची यादी खालीलप्रमाणे:
२०,००० रुपये रोख (हँडबॅगमध्ये)
१५,००० रुपये रोख (पर्समध्ये)
४,००० रुपये किमतीची हँडबॅग
दोन SBI बँक क्रेडिट कार्ड
स्टँडर्ड चार्टरर्ड मॅनहॅटन कार्ड
कोटक बिझनेस कार्ड
अॅमेक्स कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स
पेन, कंगवा, लिपस्टिक यासह एक पाऊच
चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे ३९,००० रुपये आहे.
गुन्हा दाखल आणि तपास
या घटनेची तक्रार फिर्यादी महिलेने मडगाव रेल्वे पोलीस स्टेशन येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी २.३० वाजता नोंदवली. गुन्हा क्रमांक ००/२०२५ अंतर्गत प्राथमिक नोंद झाली. त्यानंतर, दिनांक २१ फेब्रुवारी २०२५ रोजी कोकण रेल्वे पोलीस अधीक्षक कार्यालय, मडगाव यांच्याकडून संदर्भ क्रमांक एसपी/कोकण रेल्वे/एमआरजी/१०७/२०२५ अन्वये कागदपत्रे रत्नागिरी पोलीस अधीक्षक कार्यालयास प्राप्त झाली. दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८.१४ वाजता गुन्हा क्रमांक ५३/२०२५ नोंदवण्यात आला असून, तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 07-04-2025














