दापोली : ऑलिव्ह रिडले कासवांच्या वाढत्या घरट्यांमुळे दापोली तालुक्यातील दाभोळ किनारा हायलाईट झाला आहे. ६ मार्चला या किनाऱ्यावर कासवांची १२२ घरटी होती. त्यात आता वाढ होऊन २ एप्रिलला ती १९१ झाली आहेत. या घरट्यातून १७ हजार ७१३ अंडी संरक्षित करण्यात आली आहेत.
तर त्यातील ३ हजार ५९८ पिल्ले समुद्रात शेपावली आहेत. दाभोळ हा किनारा पर्यटन दृष्ट्या मागास असला तरी ऑलिव्ह रिडले कासवांच्या घरट्यांमुळे तो नावारूपास येत आहे. दापोलीतील केळशी, आडे, आंजर्ले, मुरुड, कर्दे, लाडघर, कोळथरे आणि दाभोळ या किनाऱ्यावर कासवांची घरटी आढळतात. यामध्ये सर्वाधिक घरटी ही या वर्षी दाभोळ किनारी आढळून आली आहेत. त्यामुळे
दापोली संरक्षित घरट्यातून बाहेर पडलेली कासवाची पिल्ले, रत्नागिरी जिल्ह्यात दाभोळ किनारा हा नंबर १ ची शर्यत गाठत आहे.
गेल्या ५ वर्षांमध्ये तालुक्यातील दाभोळ किनाऱ्यामध्ये घडलेल्या बदलांचा परिणाम सागरी कासवाच्या विणीवर झालेला दिसून आला आहे. गेल्या पाच वर्षात किनाऱ्याच्या रुंदीत साधारण दीड कि.मी.ची वाढ झाली आहे. कासवाची घरटीदेखील चौपटीने वाढली आहेत. २०२२ ते २०२३ सालच्या दरम्यान या किनाऱ्यावर वाळूचे संचयन मोठ्या प्रमाणावर झाल्याचे ‘सेंटलाईट मॅप’वरील छायाचित्रांच्या माध्यमातून लक्षात आले आहे.
किनाऱ्याच्या वाढीबरोबर कासवांच्या घरट्यांमध्येही वाढ झालेली दिसून येत आहे. दाभोळ किनाऱ्यावर २०२१ मध्ये कासवाची २० आणि २०२२ मध्ये १० घरटी आढळून आली होती. २०२३ साली किनाऱ्यामध्ये वाढ झाल्यानंतर ५१ घरटी आढळली, २०२४ साली ५९ घरटी आणि २०२५ साली या वर्षी २ एप्रिल रोजीपर्यंत १९१ घरटी आढळून आली आहेत.
कासवमित्र, नागरिक आणि काही तज्ज्ञ मंडळी यांच्या सहभागातून कासव संवर्धन मोहीम यशस्वी होत आहे. तर ऑलिव्ह रिडले बाबत नागरिकांमध्ये होत असलेली जनजागृती ही बाब समाधानाची आहे-किरण ठाकूर रत्नागिरी परिक्षेत्र अधिकारी कांदळवन, विभाग
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:53 AM 07/Apr/2025














