रत्नागिरी समुद्रात कर्नाटकच्या मासेमारी नौकांची घुसखोरी

रत्नागिरी : रत्नागिरीतील भाट्ये ते पावसदरम्यानच्या समुद्रात घुसखोरी करून मासेमारी करणाऱ्या परप्रांतीय कर्नाटकच्या मलपी मासेमारी नौकांचे स्थानिक मच्छीमारांनी किनाऱ्यावरून मोबाईलवर चित्रीकरण केले आहे. हे चित्रीकरण मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे. सीमाशुल्क विभागालाही हे चित्रीकरण देऊन कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार आहे. या मलपी नौकांवर कारवाई करण्यास गेल्यास हल्ला होण्याची भीती असते. त्यामुळे मलपी नौकांवर कारवाई करण्यास कोणतीही यंत्रणा धजत नाही.

रत्नागिरी जिल्ह्याला १६७ कि.मी. चा समुद्रकिनारा लाभला आहे. सुमारे पावणेचार हजार यांत्रिकी आणि बिगर यांत्रिकी स्थानिक नौका मासेमारी करतात. परंतु, गेल्या अनेक दिवसांमध्ये खर्च वसूल होईल इतकी मासळी मिळत नसल्याने मच्छीमार हवालदिल झाले आहेत. मासळीचे स्थलांतर त्याचबरोबर अत्याधुनिक मलपी नौकांची घुसखोरीसुद्धा मासळी न मिळण्याचे कारण आहे. कर्नाटकच्या मलपी बंदरातील मच्छीमार नौकांच्या जाळ्यात समुद्राच्या तळापासून पृष्ठभागापर्यंतचा मासा पकडल जातो. त्यामुळे स्थानिक मच्छीमाराना मासे मिळत नाहीत.

मलपी नौका घोळक्याने मासेमारी करतात. त्यांच्यावर स्थानिक यंत्रणा कारवाईस गेल्यास हल्ला होण्याच्या घटना घडल्या आहेत. मलपी नौका लोखंडी असून मत्स्यव्यवसाय आणि सीमाशुल्क विभागाची गस्ती नौका फायबरच्या आहेत. या गस्ती नौकांना धडक देण्याचीही मानसिकता असते. त्यामुळे अशा परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यास जाणे धोकादायक असते. त्यामुळे अशा घुसखोरी करणाऱ्या नौकांवर समुद्रात कारवाईसाठी जाताना मत्स्य व्यवसायच्या अंमलबजावणी विभागाला आणि सीमाशुल्क विभागाला पूर्ण तयारीनीशी जावे लागणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 AM 07/Apr/2025