रस्ता रुंदीकरणापूर्वी मोबदला द्या; मुरादपूर-कळकदरातील शेतकरी आक्रमक

साडवली : मुरादपूर मार्लेश्वर-कळकदरा रस्ता हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यातील रस्त्याचे कॉक्रिटीकरण व रुंदीकरणाचे काम सुरू होणार आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी जमिनीचे भूसंपादन करून योग्य तो मोबदला मिळावा. तो न मिळाल्यास पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

हा रस्ता १९७८ पासून अस्तित्वात असून, या रस्त्याखालील जमिनीची मालकी आजही शेकडो जमीनमालकांची आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ता रजिस्टरला रस्त्याखालील जमीनमालकाची आहे, हे स्पष्ट झाले असल्याने आता या रस्त्याव्यतिरिक्त रस्ता रुंदीकरणासाठी जी जमीन लागणार आहे ती विनामोबदला देण्यास ग्रामस्थांची संमत्ती नाही. त्यामुळे योग्य मोबदला दिल्याशिवाय रस्त्याचे काम करू नये, अशी मागणी केली जात आहे.

तसेच कोणत्याही ठेकदाराने यावे आणि जेसीबी लावून गरीब शेतकऱ्यांची जमीन भुईसपाट करून रस्ता रुंदीकरण करणे ही एक प्रकारची जुलूमशाही आहे, असे शेतकऱ्यांनी निवेदनात नमूद केले आहे. रस्ता रुंदीकरणासाठी ओझरे, बामणोली, मौजे मुरादपूर, हातीव, निवेखुर्द, कासारकोळवण, आंगवली, मारळ, खडीकोळवण या गावातून रस्ता जात असून, या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी व रुंदीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनी शासनाने भूसंपादनातील योग्य तरतुदीनुसार घ्याव्यात. त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

या जमिनीचा मोबदला रेडिरेकनर दराच्या चारपट या दराने संबंधित खातेदार, शेतकरी यांना देण्यात यावा तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने हे काम तातडीने थांबवण्याबाबत आदेश द्यावेत. यानंतरही सार्वजनिक बांधकाम विभागाने भूसंपादन न करताच रस्त्याचे काम केल्यास शेतकरी आंदोलन करतील, असा इशारा देण्यात आला

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:48 PM 07/Apr/2025