रत्नागिरी : पुरातत्त्व विभागाचे ६ कोटी गेले परत

रत्नागिरी : येथील पुरातत्त्व विभागाला बीडीएस यंत्रणेचा वेळेचा फटका बसला आहे. संग्रहालय (म्युझियम) आणि इतर कामांसाठी आलेले ६ कोटी रुपये त्यामुळे परत गेले आहेत. तांत्रिक गोष्टीमुळे परत गेलेले पैसे पुन्हा मिळावेत यासाठी पुरातत्त्व विभागाच्या हालचाली सुरू आहेत तसेच राज्य संरक्षित असलेल्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी पुरातत्त्व विभागाने १५ कोटींच्या निधीचा प्रस्ताव शासनाला दिला आहे.

शासकीय कार्यालयांचे देणे व अनुदान वाटपाची अखेर ३१ मार्चला झाली. दरवर्षाप्रमाणे यंदाही शासनाचे अर्थसंकल्पीय अनुदान वर्षांच्या अखेरच्या दिवशी विविध विभागांकडून अदा करण्यात येते. त्यात शासकीय योजना व अनुदानाचा तसेच कामांच्या देयकांचा संबंध असतो. त्याचप्रमाणे शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय देयके, प्रवास बिले, कार्यालयीन खर्चदेखील हे आर्थिक वर्षाअखेर अदा केले जातात. त्या त्या विभागाच्या बीडीएस प्रणालीद्वारे शासकीय अनुदान दिले जाते. पुरात्तत्त्व विभागालादेखील वस्तुसंग्रहालयाच्या नवीन दालनासाठी सुमारे साडेचार कोटी आणि इतर कामांचे मिळून ६ कोटी रुपये येणार होते.

बीडीएस प्रणाली ११ वाजता बंद झाली आणि ११ वाजून १० मिनिटांनी शासनाकडून निधी आला. बीडीएस यंत्रणा बंद झाल्यामुळे शासनाचा हा निधी संबंधित विभागाकडे न जाता परत गेला. वेळेचा तांत्रिक फटका पुरातत्त्व विभागाला बसला आहे. थिबा पॅलेस येथील वस्तुसंग्रहालयाचे नवे दालन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी हा निधी आला होता. एमएसआरडीच्या माध्यमातून हे काम होणार आहे. त्यांना हा निधी वर्ग केला जाणार होता.

पुरातत्त्व विभागाचा हा निधी परत गेला असला तरी जिल्ह्यातील राज्य संरक्षित असलेल्या गडकिल्ल्यांच्या दुरुस्तीसाठी १५ कोटींची मागणी शासनाकडे केली आहे. राजापूर नाटे येथील किल्ला, गोवा किल्ला, हर्णे किल्ला आदींचा यामध्ये समावेश आहे.

या किल्ल्यांच्या दुरुस्तीचे काम झाले आहे, तर काही ठिकाणी सुरू आहे. त्याचे १५ कोटी मिळावेत, अशी मागणी पुरातत्त्व विभागाने केली आहे.

बीडीएसप्रणाली बंद झाली आणि शासनाचा निधी आला. त्यामुळे तो निधी परत गेला असला तरी पुन्हा आम्हाला मिळावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. – विलास वहाणे, पुरातत्त्व विभाग अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:55 PM 07/Apr/2025