वैभववाडी : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील पात्र चार हजार १९६ शेतकऱ्यांच्या खात्यात काजू अनुदानाची रक्कम जमा होण्यास कालपासून सुरुवात झाली. रत्नागिरीतील ४८० काजू उत्पादकांना ७१ लाख ७६ हजार अनुदान मिळणार आहे. अनुदान मिळण्यासाठी फळबागायतदार संघाने सातत्याने पाठपुरावा केला होता.
गेल्या वर्षी बदलत्या वातावरणाचा मोठा फटका काजू बागायतदारांना बसला. एकीकडे उत्पादन कमी असताना काजू बीचा दर प्रतिकिलो १२० रुपयांपर्यंत घसरला. त्यामुळे बागायतदार आर्थिक संकटात सापडले. यावरून फळबागायतदार संघाने काजू बीचा दर प्रतिकिलो २०० रुपये करावा, गोव्याच्या धर्तीवर शासनाने हमीभाव निश्चित करून शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी मागणी करीत अनेक आंदोलने केली. माजी आमदार प्रमोद जठार यांनी भावांतर योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, अशी भूमिका मांडली. त्यानंतर शासनस्तरावर तत्कालीन पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि तत्कालीन मंत्री दीपक केसरकर यांनी मंत्रालयस्तरावर बैठक घेतली. गेल्यावर्षी लोकसभा निवडणुकीच्या अगोदर शासनाने या तिन्ही जिल्ह्यातील काजू उत्पादकांसाठी दहा कोटी अनुदान जाहीर केले.
त्यासाठी जास्तीत २००० हजार किलोपर्यत बी वर हे अनुदान देण्याचे निश्चित करतानाच २० हजार रूपयांपर्यंत अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला; मात्र, या योजनेत अनेक जाचक अटींचा समावेश होता. उत्पादकांनी पुन्हा आंदोलन केले. त्यानंतर काही अटी कमी केल्या.
तिन्ही जिल्ह्यातून पाच हजार १५८ अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी चार हजार १९६ अर्ज पात्र ठरले. उर्वरित ९८९ अर्ज पुर्ततेसाठी पुन्हा पाठविण्यात आले. सिंधुदुर्गातील दोन हजार २० शेतकऱ्यांना दोन कोटी ३४ लाख १३ हजार रूपये, रत्नागिरीतील ४८० काजू उत्पादकांना ७१ लाख ७६ हजार; तर कोल्हापूर जिल्ह्यातील एक हजार ६९६ शेतकऱ्यांना एक कोटी ९१ लाख पाच हजार ७११ रुपये मंजूर झाले आहेत
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 10/Apr/2025













