माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाचे दापोलीत अधिवेशन

लांजा : रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आयोजित महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे ६३वे राज्यस्तरीय वार्षिक अधिवेशन १२ व १३ एप्रिल रोजी होणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात त्याचे आयोजन करण्यात आले आहे.

दापोलीत होत असलेल्या या अधिवेशनाचे उ‌द्घाटन पालकमंत्री उदय सामंत व शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते होईल. यावेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम, राज्य महामंडळ उपाध्यक्ष सुनील पंडित (अहिल्यानगर) हे अधिवेशनाचे अध्यक्ष असतील. उ‌द्घाटनाला विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे, रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले, महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे, मत्स्य व्यवसाय व बंदर विकासमंत्री नीतेश राणे, शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार निरंजन डावखरे, आमदार जयंत आसगांवकर, शिक्षक आमदार किशोर दराडे, आमदार भास्करराव जाधव, आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, कोकण कृषी विद्यापिठाचे कुलगुरू संजय भावे उपस्थित राहणार आहेत.

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी १२ रोजी दुपारी ३ वाजता “महाराष्ट्रातील सीबीएसई पॅटर्न केंद्रीय व राज्य : शिक्षण मंडळ तुलनात्मक अभ्यास” या शोधनिबंधाचे सादरीकरण करण्यात येणार आहे. दुपारी ४.३० वाजता मुख्याध्यापक महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार आमदार रवींद्र चव्हाण व कुलगुरू डॉ. संजय भावे यांच्या हस्ते होणार आहे. १३ रोजी सकाळी ९.३० वाजता “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० व मुख्याध्यापक भूमिका” या विषयावर डॉ. बी. एम. हिर्डेकर यांचे व्याख्यान होईल, तर १०.३० वाजता माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते गुणवंत मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण होणार आहे. मुख्याध्यापकांनी अधिवेशनाला उपस्थित राहावे, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, सचिव नंदकुमार सागर यांनी केले आहे

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:36 AM 10/Apr/2025