मुंबई संगीत नाट्य महोत्सवात खल्वायन आणि चित्पावन ब्राह्मण संघाची नाटके

रत्नागिरी : गेली २८ वर्षे नवनवीन नाटकांची निर्मिती करून महाराष्ट्रातील सांस्कृतिक परंपरा खल्वायनने जपली आहे. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत गेली सहा सात वर्षे अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ संस्थेने संगीत रंगभूमीवर दर्जेदार नाटके सादर केली आहेत. या दोन संस्थांना मुंबई येथील संगीत नाट्य महोत्सवात आमंत्रित करण्यात आले आहे. हा महोत्सव मुंबई येथील दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये ११ ते १३ एप्रिल रोजी होणार आहे.

संगीत अमृतवेल हे नवीन संगीत नाटक रत्नागिरीचे प्रसिद्ध कादंबरीकार आणि नाटककार डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेले असून, दिग्दर्शन मनोहर जोशी यांनी केले आहे तर संगीत दिग्दर्शन रत्नागिरीच्याच राम तांबे यांनी केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ६२व्या राज्य नाट्य स्पर्धेत या नाटकाला ८ वैयक्तिक पारितोषिकासह तृतीय क्रमांक मिळाला होता.

खल्वायनच्या नव्या-जुन्या कलावंतांच्या समर्थ अभिनय व गायकीने नटलेले हे नाटक असून, या नाटकात चिपळूणची उद्योन्मुख युवा गायिका गंधाली भागवत ही या नाटकातील प्रमुख भूमिकेद्वारे संगीत रंगभूमीवर प्रथमच पदार्पण करत आहे.

तसेच देवगडचा उद्योन्मुख युवा ऑर्गनवादक पार्थ परांजपे हा पण संगीत नाटकासाठी प्रथमच ऑर्गनची साथ करत आहे. या नाटकाचे नेपथ्य प्रदीप तेंडुलकर, प्रकाशयोजना मंगेश लाकडे, रंगभूषा रामदास मोरे, पार्श्वसंगीत प्राजक्ता जोशी, तसेच तबलासाथ हेरंब जोगळेकर, पखवाजसाथ देवाशीष बापट व तालवाद्यसाथ प्रथमेश फाटक यांची आहे. अनामय बापट, गंधाली भागवत, नीता जोशी, अनिकेत आपटे, मनोहर जोशी, विजय जोशी, राम तांबे, चेतन जोशी, कौस्तुभ सरपोतदार, प्रदीप तेंडुलकर, मोहन धांगडे, किशोर नेवरेकर, संजय लोगडे, सौरभ लोगडे, सुधाकर घाणेकर यांनी भूमिका केल्या आहेत. हे नाटक ११ एप्रिलला खल्वायन संस्था मुंबईत सादर करणार आहे.

तसेच संगीत ययाती आणि देवयानी हे नाटक अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहायक मंडळ, रत्नागिरी ही संस्था १२ एप्रिलला तेथे सादर करणार आहे. वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी लिहिलेले असून, गणेश जोशी यांनी दिग्दर्शित केले आहे. तसेच चिपळूणच्या स्मिता करंदीकर यांनी संगीत मार्गदर्शन केले आहे.

राज्य नाट्य स्पर्धा व देवरूख येथे नुकत्याच झालेल्या नाट्य महोत्सवातील या नाटकाच्या सादरीकरणाने रसिक प्रेक्षक भारावून गेले होते. या नाटकासाठी रंगभूषा व नेपथ्य रामदास मोरे व सहकारी, प्रकाश योजना यश सुर्वे, पार्श्वसंगीत अक्षय पेडणेकर, ऑर्गनसाथ अमित ओक, तबलासाथ हेरंब जोगळेकर यांनी केली आहे, तर प्रदीप तेंडुलकर, गणेश जोशी, शमिका जोशी, मुक्ता जोशी, उमेश जोशी, चिन्मय दामले व दत्तगुरू केळकर हे या नाटकातील कलावंत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:38 PM 10/Apr/2025