चिपळूण : सह्याद्रीच्या खोऱ्यातील भैरवगडाची सफारी

चिपळूण : चिपळूण तालुका पर्यटनवाढीसाठी प्रयत्नशील असलेल्या येथील ग्लोबल चिपळूण टुरिझमतर्फे आयोजित सह्याद्रीच्या खोऱ्यातील कोयना-भैरवगड जीप सफारी व रामबाण ट्रेलचा आनंद सावर्डे येथील डॉक्टर असोसएशनच्या सदस्यांनी घेतला. कोयना हेळवाक येथून जीपमधून भैरवगडापर्यंत पर्यटकांना निसर्गाच्या सान्निध्यात घनदाट जंगलातून जीप सफारी करण्याचा आनंद डॉक्टरांच्या चमूने घेतला.

भैरवगडला जाताना जंगलातील असंख्य फुलपाखरे, वनविभागाने तयार केलेल्या कुटीजवळ जंगल व जंगलातील प्राणी वाचविण्यासाठी काय काय करता येईल व जंगलातील झाडांची माहिती गाईड सागर जाधव यांनी दिली. वाघामुळे जंगलातील अन्नसाखळी कशी पूर्ण होते व कोयना व्याघ्र प्रकल्पामध्ये वाघ येण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांबाबत विश्वास पाटील यांनी माहिती दिली. माहिती देत असतानाच महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरू, हॉक ईगल पाहायला मिळाले. समुद्रसपाटीपासून ३००० फूट उंचीवर असणाऱ्या भैरवगड किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात टेहळणी करण्यासाठी कसा उपयोग केला जायचा, भैरवगड किल्ल्यावरून प्रचितगड, जयगड, जंगली जयगड, वासोटा या किल्ला परिसराची पाहणी केली जायची, याची माहिती गाईड उमेश कदम यांनी दिली.

यानंतर पर्यटकांनी किल्ल्यावर असणारे बुरूज, पाण्याचे टाक्या पाहिल्या. आजही किल्ल्यावर पाण्याच्या टाक्यांत पाणी असून, जंगली प्राण्यांना त्याचा उपयोग होतो. या परिसरात बिबटे, गवारेडा, अस्वल, घोरपड असल्याच्या खाणाखुणा दिसून येत होत्या. या जंगलात हरणटोळ या जातीच्या सापाचेही दर्शन झाले.

शिवसागर जलाशय पाहून चौथ्या टप्प्यांतून येताना जंगली जयगड व कोयना जलविद्युत प्रकल्पाची माहिती देण्यात आली.

श्रीरामांनी बाण मारून काढले पाणी
श्रीराम नवमीनिमित्त कोयना येथील रामबाण या ठिकाणी प्रत्येक वर्षी गावातील सर्व लोक पूजा करतात. श्रीराम व सीता वनवासात फिरताना सीतामातेस तहान लागली असता श्रीराम यांनी बाण मारून पाणी काढले, अशी आख्यायिका असल्याची माहिती महेश शेलार यांनी दिली. ते पाणी आजही तेथे एप्रिलच्या उन्हाळ्यातही दिसून येते व त्याची एक पातळी राहते. आजही या जागेचे जतन ग्रामस्थ व वनविभागाकडून केले जाते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:53 PM 10/Apr/2025