रामपूर आरोग्य केंद्रात १५ हजार रुग्णांची तपासणी

रामपूर : चिपळूण-गुहागर तालुक्यांना जोडणारे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या अधिपत्याखाली एकूण २८ ते ३० गावे येतात. ३१ मार्च २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वैद्यकीय अधिकारी डॉ. मुंढे, वैद्यकीय अधिकारी डॉ. निकिता शिर्के यांनी १५ हजार रुग्णांची आरोग्याची तपासणी केली.

२४६ विंचू दंश झालेल्या रुग्णांवर योग्य उपचार केले. या वर्षात एकूण १६ सर्पदंश झाले. सर्वांना दंश लस उपलब्ध करण्यात आली. १०९ श्वानदंश झाले. त्यावर उपाययोजना केली. एकूण ७३ कुटुंब नियोजन केसेस झाल्या. ७ सुखरूप प्रसूती झाल्या. रुग्णांना योग्य सेवा मिळत आहे. त्यांना रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने सेवा पुरवली जाते.

रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत गुढे, मिरवणे, बामणोली, चिवेली, मार्गताम्हाणे, उभळे अशी सहा उपकेंद्र आहेत. गुढे, बामणोली, चिवेली, उभळे उपकेंद्रांच्या इमारती आहेत. मात्र मिरवणे, मार्गताम्हाणे उपकेंद्राना इमारत नाही. ही इमारत लवकरात लवकर व्हावी, अशी मागणी होत आहे.

गुढे, बामणोली, उभळे, चिवेली उपकेंद्रांना २५ हजार रुपये कायाकल्प प्रोत्साहनपर बक्षीस मिळाले आहे. रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्राला कायाकल्प दोन लाखांचा २०२३ २०२४ या वर्षासाठी प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या प्रयत्नामुळे रामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रला ग्रामीण रुग्णालय दर्जा मिळाला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 11/Apr/2025