देवरूख शहरात श्वानांचे निर्बीजीकरण सुरू

देवरूख : शहरात उनाड श्वानांच्या झुंडीच्या झुंडी फिरत होत्या व समूहाने जावून नागरिकांवर हल्ला करत होत्या. या श्वानांचा तातडीने बंदोबस्त करा, अशी नागरिकांमधून मागणी होती. अखेर या मागणीला यश आले आहे. मुख्याधिकारी यांनी श्वान निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण यासाठी निविदा मागवल्या होत्या. हे काम निर्मिती व लोककल्याण संस्था नागपूर यांना दिले आहे.

देवरुख शहरात श्वान निर्बीजीकरण व रेबीज लसीकरण मोहिम सुरु करण्यात आली आहे. तसे ध्वनिक्षेपकावरुन शहरात जनजागृती करण्यात आली आहे. खरेतर दरवर्षी ही मोहिम राबवली जात असते. देवरुख नगरपंचायतीने २०२२ साली ९६ श्वानांचे निर्बिजीकरण केले होते. तीन वर्षांनी पुन्हा ही मोहीम राबावली जात आहे.

एका महिलेवर झालेल्या हल्ल्यात ही महिला खाली पडली व तिच्या डोक्याला मार लागला होता. स्टेट बैंक रोडवर एका दुचाकी युवतीचा श्वानांची पाठलाग केला होता. या युवतीच्या दुचाकीने वृद्धाला धडक दिली होती यात वृद्धाला दुखापत झाली होती.

दत्तनगर येथे शाळकरी मुलीला श्वानांनी घेरले होते ही बाब मुख्याधिकारी चेतन विसपुते यांच्या निदर्शनास आली व त्यांनी त्या मुलीची सुटका केली होती. श्वानांचे निर्बीजीकरण पथकात तज्ज्ञ डॉक्टर, प्राणीमित्र, नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. देवरूख शहरातील प्राणीमित्रांनी या मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतीने केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 11/Apr/2025