देवरूख बस स्थानकातील दुर्गंधीने प्रवासी हैराण

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील देवरूख आगारात स्वच्छतागृहात पाणी नसल्याने दुर्गंधीने प्रवासी हैराण झाले आहेत. तसेच पिण्यासाठी पाणी नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. ऐन हंगामात पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. विशेष म्हणजे बस स्थानकातील स्वच्छतागृहांमध्ये पाणी नसल्याने तेथे कमालीची दुर्गंधी पसरली असून अस्वच्छतेमुळे प्रवाशांना नाक मुरडावे लागत आहे.

देवरूख हे परिसरातील अनेक गावांसाठी महत्त्वाचे बाजारपेठ केंद्र आहे. येथे नेहमीच प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या बस स्थानकात पिण्याच्या पाण्याची तसेच स्वच्छतागृहांमध्ये पाण्याची उपलब्धता नसल्याने प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पाण्याची टंचाई आणि स्वच्छतागृहांमधील घाणीमुळे प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

कर्मचाऱ्यांनी सांगितले की, बस स्थानकाच्या आवारातील विहिरीतील पाण्याची पातळी घटली आहे. विहिरीत जेव्हा पुरेसे पाणी जमा होते, तेव्हा टाकी भरली जाते. परंतु, सध्या प्रवाशांची गर्दी अधिक असल्याने एका टाकीतील पाणी पुरेसे ठरत नाही. नगर परिषदेकडून नियमित पाणीपुरवठा होत नाही आणि जरी झाला तरी तो अपुरा असतो. यापूर्वी पाण्याची गाडी येत होती, परंतु ती आता बंद झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

ऐन हंगामात देवरूख बस स्थानकावर पाण्याची टंचाई निर्माण झाल्याने दूरदूरहून आलेल्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. स्थानक प्रशासनाने तातडीने या समस्येवर तोडगा काढावा, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे. नगर परिषद आणि संबंधित प्रशासनाने याची दखल घेऊन त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

देवरुख हे तालुक्याचे ठिकाण आहे. दररोज आजूबाजूच्या गावातून अनेक नागरिक शहरात येत असतात. देवरुख बस स्थानकात जर पाण्याचा तुटवडा असेल तर नगरपंचायत प्रशासनाने तातडीने या ठिकाणी मुबलक पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी. एसटी प्रशासनाने सुद्धा प्रवाशांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडे यासाठी पाठपुरावा करायला हवा. हा प्रश्न वेळीच न सुटल्यास गाव विकास समितीच्या माध्यमातून आमच्या शहर अध्यक्ष सौ. अनघा कांगणे व आमची टीम संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन हा विषय प्रशासनाच्या लक्षात आणून देईल- सौ. दीक्षा खंडागळे-गिते, महिला अध्यक्षा, गाव विकास समिती रत्नागिरी जिल्हा

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 15/Apr/2025