शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या घटनेत संभाजी भिडे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कुत्र्याने चावा घेतल्यानंतर संभाजी भिडेंना डॉक्टरांकडून दोन इंजेक्शन देण्यात आले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. आता या घटनेनंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संभाजी भिडेंवर उपरोधिक टीका केली आहे.
विजय वडेट्टीवार यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना संभाजी भिडेंवर झालेल्या कुत्र्याच्या हल्ल्यावर विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. संभाजी भिडे यांना चावणाऱ्या कुत्र्याची SIT चौकशी करा, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“काय त्या कुत्र्याला दुर्बुद्धी सुचली. कुणाला चावावं हे कुत्र्याला कळलं नाही याचं वाईट वाटतं. पोलीस नक्की कुत्रा शोधत आहे, याची अजून माहिती मिळालेली नाही. मी माहिती घेतो. कुत्रा हा प्रामाणिक प्राणी असतो, मात्र या प्रामाणिक प्राण्याने का असा राग धरला यासंदर्भात एसआयटी लावून चौकशी केली पाहिजे”, असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांचा टोला
“कुत्रा कोणाला चावल्याशिवाय आणि तोही महत्त्वाच्या माणसाला चावल्याशिवाय कुत्रे काही उचलले जात नाहीत. आता महत्त्वाच्या माणसाला चावावेत अशी आपण देवाकडे प्रार्थना करुया म्हणजे सर्वसामान्यांना न्याय मिळेल. या सरकारमध्ये कुत्राही मोठ्या माणसाला चावला तरच सापडतो. या सरकारची कार्य करण्याची पद्धत योग्य आहे”, असा टोला राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.
नेमकं काय घडलं?
संभाजी भिडे यांच्यावर कुत्र्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. काल रात्री उशिरा कार्यक्रम संपवून घरी जात असताना भिडे गुरुजींवर एका भटक्या कुत्र्याने हल्ला केला. यावेळी त्या कुत्र्याने त्यांच्या पायाचा चावा घेतला. सांगली शहरातील माळी गल्ली या ठिकाणी ही घटना घडली. यानंतर जखमी झालेल्या भिडे गुरूजींना तात्काळ उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर संभाजी भिडेंना डॉक्टरकडून दोन इंजेक्शन देण्यात आली आहेत. सध्या संभाजी भिडेंची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांकडून विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. संभाजी भिडेंना येत्या दोन दिवसात आणखी इंजेक्शन देण्यात येणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:46 15-04-2025
