राजापूर : करक-पांगरीमध्ये बोगस कागदपत्रांद्वारे १० लाख ८७ हजारांची फसवणूक

राजापूर : तालुक्यातील करक-पांगरी विविध कार्यकारी सोसायटीने शासनाच्या शेती कर्जमाफी योजनेत बोगस कागदपत्रे सादर करून १० लाख ८७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सोसायटीच्या अध्यक्ष व संचालक मंडळासह ९ जणांविरोधात राजापूर पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घोटाळ्याची तक्रार दाखल झाल्यानंतर २०१७ ते २०२० या कालावधीतील शासकीय ऑडिट रितसर शुल्क भरून करून घेण्यात आले होते, सरकारी ऑडिटर, चिपळूण येथील बाबासाहेब गीते यांना ऑडिट रिपोर्टमध्ये अनियमितता आढळल्यानंतर गीते यांनी राजापूर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. या नंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार करक-पांगरी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. करक, ता. राजापूर, जि. रत्नागिरी या संस्थेच्या संचालकांसह ९ जणांनी महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत शासकीय निधीचा गैरवापर व कर्जदार यांना चुकीच्या पद्धतीने लाभ देऊन शासकीय निधीचा गैरव्यवहार केल्याची फिर्यादी फेरलेखा परीक्षणवेळी निदर्शनास आली. शासकीय निधीचा फेरलेखा परीक्षण कालावधीत संशयितांनी शासनाची फसवणूक व संस्थेमध्ये आर्थिक फसवणूक अपहार केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये फसवणूक केलेली रक्कम १०,८७,७१८.६२/- (दहा लाख सत्याऐंशी हजार सातशे अठरा रुपये बासष्ठ पैसे.) इतकी असल्याची माहितीही यावेळी राजापूर पोलिसानी दिली आहे. या गुन्ह्यांतर्गत करक-पांगरी सोसायटीचे अध्यक्ष संपूर्ण संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास राजापूर तालुका पोलीस निरीक्षक अमित यादव करत आहेत. या घटनेमुळे सहकारी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:06 AM 23/Apr/2025