खेड : तालुक्यातील घाणेखुंट येथे एका २३ वर्षीय गरोदर महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. अंगुरी खातुन असे मयत महिलेचे नाव असून त्या मूळच्या झारखंडमधील ग्राम मिल्कि, पो. हनवारा, जि. गोड्डा येथील रहिवासी होत्या. सध्या त्या घाणेखुंट येथे ईकबाल खान यांच्या चाळीत भाड्याने राहत होत्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अंगुरी खातुन या तीन महिन्यांच्या गरोदर होत्या. दिनांक २० एप्रिल २०२५ रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास त्यांना गुप्त भागातून रक्तस्राव सुरू झाल्याने त्यांना तातडीने पर्शुराम हॉस्पिटल, घाणेखुंट येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्राथमिक तपासणी करून औषधे दिली आणि सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. मात्र रात्रीची वेळ असल्यामुळे दुसऱ्या दिवशी सोनोग्राफी करण्याचे ठरवून त्या घरी परत आल्या.
२१ एप्रिल रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास अंगुरी खातुन यांची तब्येत अचानक बिघडली आणि त्या बेशुद्ध झाल्या. त्यानंतर तातडीने त्यांना अँब्युलन्सद्वारे उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांना मृत घोषित केले. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:44 AM 23/Apr/2025














