रत्नागिरी : शहरानजीकच्या खेडशी येथील ४ आणि फणसवळे येथील १ अशी एकूण ५ बंद घरे एकाच रात्रीत फोडून चोरट्यांनी धुमाकूळ घातला. या घटनांमध्ये चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह लाखोंचा मुद्देमाल लांबवला. ही घटना सोमवार, २१ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे.
खेडशी येथील विश्वास दत्तात्रय देसाई आणि त्यांच्या घराशेजारी अन्य ३ घरे तसेच फणसवळे येथील भिकाजी माने यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले. यातील विश्वास देसाई कुटुंबासह उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी जम्मू-काश्मीरला गेले आहेत. मंगळवारी सकाळी विश्वास देसाई यांच्या शेजाऱ्यांना त्यांचे घर फोडलेले दिसून आले. त्यांनी तातडीने या बाबत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. ग्रामीण पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना देसाईंच्या घरासोबतच आजूबाजूची अन्य तीन घरे चोरट्यांनी फोडलेली दिसून आली. दरम्यान, खेडशी नजीकच असलेल्या फणसवळे येथील भिकाजी माने हे कुटुंबासह मुंबईला असतात त्यांचे बंद घरही अज्ञातांनी फोडल्याचे मंगळवारी सकाळी त्यांच्या शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनीही ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिली. ग्रामीण पोलिसांनी खेडशी आणि फणसवळे येथील घटनास्थळी तातडीने धाव घेत चोरीचा पंचनामा केला. सायंकाळी उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
घरफोडी करणाऱ्या चोरट्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. काही दिवसांपूर्वीच पोलिस असल्याची बतावणी करत ग्रामीण पोलिस आणि शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन महिलांचे दागिने लांबवल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता एकाच रात्री ५ घरफोड्या झाल्यामुळे पोलिस विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 AM 23/Apr/2025














