आंबा घाटातील रस्ता संरक्षक कठड्याविना बनलाय धोकादायक

संगमेश्वर : पूर्वीचा रत्नागिरी-कोल्हापूर व सध्याचा मिऱ्या-नागपूर महामार्गावरील आंबाघाटातील चौपदरीकरण वेगात सुरू आहे. या ठिकाणी दरड खाली येऊ नये म्हणून कंपनीकडून चांगल्या प्रकारच्या जाळ्या लावण्याचे काम सुरू आहे; मात्र याउलट दरीच्या बाजूने असणारे कठडे योग्यरित्या संरक्षित केले नसल्याने मागील १५ दिवसांत त्या ठिकाणी ट्रकचे दोन अपघात घडले आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र प्रचंड आर्थिक नुकसान झाले. तिथे सुरक्षेसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालकांकडून सुरू आहे.

कोल्हापूरवरून रत्नागिरीच्या दिशेने येताना रस्त्याची रूंदी अरुंद आहे त्याचबरोबर जागेवर वळण असल्यामुळे वाहनचालकांना गाडी चालवताना कसरत करावी लागते. या ठिकाणी सुरक्षेची उपाययोजना करणे गरजेचे आहे. ठेकेदार कंपनी व महामार्ग विभाग यांनी ताबडतोब यावर कार्यवाही करावी, अशी मागणी सर्वसामान्य वाहतूकदार यांच्याकडून होत आहे.

तेथे यापूर्वी अनेक गाड्या दरीत जाऊन प्रवाशांना जीव गमावावा लागला आहे. या ठिकाणी पर्यटकही घाटाचा आनंद घेण्यासाठी थांबतात. भविष्यात तिथे मोठी दुर्घटना घडली तर त्याला कोण जबाबदार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तिथे २८ मार्च दिवशी दोन ट्रक खोल दरीत कोसळून अपघात घडला होता. त्यात ट्रकचे नुकसान झाले होते. दरी खोल असल्यामुळे ट्रकचे अवशेष व त्यामधील माल काढणेही अवघड झाले होते.

आंबाघाटामध्ये चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. सध्या या ठिकाणाहून वाहने चालवताना काळजी घ्यावी लागते. त्या ठिकाणी वाहनांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची गरज आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिले पाहिजे- गुरू सावंत, वाहनचालक, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 AM 17/Apr/2025