जगबुडी नदीपात्रातून ३८६० घनमीटर गाळ उपसा

खेड : शहरातील जगबुडी नदीपात्रातून गाळ उपसण्याची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या १२ दिवसात ३८६० घनमीटर गाळ उपसा करण्यात आला. आतापर्यंत ८३३१ घनमीटर गाळ उपसण्यात आल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.

पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गणेश सलगर, नातूनगर पाटबंधारे उपविभागीय अधिकारी सत्यजीत गोसावी, कनिष्ठ अभियंता हेमंत ढवण, बळवंत पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोकलेन मशिनच्या सहाय्याने अलोरेतील जलसंपदा विभागाची यंत्रणा गाळ उपसण्याच्या प्रक्रियेत गुंतली आहे.

उपसलेला गाळ शेतकरी स्वतःहून वाहनांद्वारे उचलून आवश्यक त्या ठिकाणी वाहतूक करत आहेत. पाऊस पडेपर्यंत गाळ उपसा प्रक्रिया सुरू राहणार असल्याने येत्या काही दिवसात जास्तीत जास्त गाळ उपसण्यात येणार आहे. यंदा जगबुडीच्या पुराच्या पाण्याची टांगती तलवार दूर होण्याच्या शक्यतेने आतापासूनच व्यापारी व नदीकाठचे रहिवासी सुखावले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 18/Apr/2025