रत्नागिरी : शहरात पाण्याची समस्या साऱ्यांना भेडसावत आहे. शहरातील अंतर्गत परिसरात असणाऱ्या तलावाच्या रूपाने पाण्याचे स्रोत आहेत; मात्र पालिकेच्या माध्यमातून त्याची देखभाल केली जाते; पण सध्या हे तलाव गाळ व कचऱ्यांनी भरलेले असून, त्यातील मासे व कासवांचा अधिवास धोक्यात असून तलावांची दुरवस्था झालो आहे. शहरातील या नैसर्गिक तलावांचे संवर्धन व सुशोभीकरण करावे, अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. स्मार्ट सीटीअंतर्गत शहरातील दोन तलावांचे सुशोभीकरण होणार आहे.
शहर वसल्यापासूनच हे तलाव शहरातील तेलीआळी, परटवणे, मच्छीमार्केट, दैवज्ञ भवन येथे आहेत. पालिकेच्या माध्यमातून त्यांची डागडुजी केली जाते; पण या स्रोताकडे पुन्हा ढुंकून पाहिले जात नाही. त्यामुळे त्यातील मासे, कासव, बदके यांचा अधिवास संपुष्टात येण्याची भीती आहे. हे तलाव गाळ व शेवाळाने भरले आहेत. पाण्याचा रंगही बदलला आहे.
पूर्वी या पाण्याचा उपयोग मुले पोहण्यासाठी करत होते. साफसफाई राहात होती; मात्र काही ठिकाणी अनुचित प्रकार घडल्यामुळे या तलावांकडे कुणी ढुंकूनही पाहात नसल्याचे दिसून येत आहे. आहे. गोडीबाव-तेलीआळी येथील या तळ्यात पोहण्याचा आनंद काहीकाळ मुले लुटत होते. उन्हाळ्यात या पाण्याची पातळी कमी झाली आहे. दुपारच्या वेळात या तलावातून कासव काठावर येतात.
परटवणे संत गाडगे महाराज येथील तलावात गाळ आणि जलपर्णिकांची वाढ झाली आहे. साफसफाई झाली असती तर तलावातील पाण्याचे स्रोत कमी झाले नसते. या जलपर्णिकांच्या वेढ्यात चार बदके विहार करताना दिसतात. लहान मुलांसाठी ही कुतूहलाची बाब होती; पण त्या ठिकाणी कोणीही फिरकत नाही. पालिकेने या तलावाभोवती संरक्षणासाठी स्टीलच्या पाईप लावल्या आहेत. परटवणे येथील नदीचा गाळ काढला असला तरी नदीच्या काठावरच कचऱ्याचे ढीग आणि दूषित पाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे.
मच्छीमार्केट येथील तलावात पाणी आहे; पण तिथे कचराही टाकला जातो. तलावाच्या तळाशी थोडेसे पाणी आहे; परंतु घाणीमुळे या तलावाची दुरवस्था झाली आहे. तेलीआळी, मच्छीमार्केट, परटवणे, दैवज्ञभवन नजीकच्या तलावांची दैन्यावस्था झाली आहे.
रत्नागिरी शहरामध्ये असलेल्या पाच तलावांची देखभाल पालिकेकडेच आहे. त्यापैकी दोन तलाव पालकमंत्री उदय सामंत यांच्या पुढाकारामुळे होणाऱ्या स्मार्टसिटीमध्ये घेतले आहेत. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करून या तलावांचे सुशोभीकरण होणार आहे. उर्वरित तलावांचेही संवर्धन केले जाणार – तुषार बाबर, मुख्याधिकारी, रत्नागिरी पालिका
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:38 AM 19/Apr/2025














