गुहागरमधील सरपंच पदासाठी उद्या आरक्षण सोडत

गुहागर : गुहागर तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत २२ एप्रिलला करण्यात येणार आहे. हे आरक्षण २०२५ ते २०३० या कालावधीसाठी असेल. हा सोडत कार्यक्रम श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे येथे होणार आहे. आगामी निवडणुकीत ग्रामपंचायतीचा कारभार हाकण्यास इच्छुक असलेल्यांचे लक्ष या सोडतीकडे लागून राहिले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील तालुकानिहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याच्या सूचना ११ एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयाला मिळाल्या. जिल्हाधिकारी यांनी या संदर्भात तहसीलदारांना सूचना करुन तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या.

गुहागरचे तहसीलदार परिक्षीत पाटील यांनी तालुक्यातील ६६ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण निश्चितीसाठी २२ एप्रिलला कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. २२ एप्रिलला सकाळी ११.०० वा. श्रीपूजा सेवा मंगल कार्यालय, पाटपन्हाळे येथे हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये महिला सरपंच पदासाठी कोणत्या ग्रामपंचायती आरक्षित होणार, कोणत्या ग्रामपंचायतींमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीमधील सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार हे ठरणार आहे. तालुक्यातील १० ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. त्यामुळे या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या निवडणुका कधीही लागू शकतात, अशी स्थिती आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:24 PM 21/Apr/2025