परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश; दिवाळीपूर्वी वेतन देण्याचा शब्द पाळला
MSRTC Employee Diwali Salary : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) अधिकारी व कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंदात जावी, यासाठी दिवाळीपूर्वीच वेतन देण्याचा दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक ती आर्थिक तरतूद उपलब्ध व्हावी, यासाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून, महाराष्ट्र शासनाने एसटी महामंडळाला सप्टेंबर २०२६ मधील प्रवासी सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी ₹३९१.०२ कोटींचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. यासंदर्भातील अधिकृत शासन निर्णय २७ ऑक्टोबर २०२६ रोजी निर्गमित करण्यात आला आहे.
८३ हजार कर्मचाऱ्यांना सणापूर्वी मिळणार वेतन
एसटी महामंडळातील सुमारे ८३ हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन साधारणतः दर महिन्याच्या ७ ते १० तारखेदरम्यान अदा केले जाते. मात्र, यंदा ६ नोव्हेंबरपासून दिवाळी सणाला सुरुवात होत असल्याने कर्मचाऱ्यांना सणापूर्वीच हक्काचे वेतन मिळावे, यासाठी मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार शासनाकडून आवश्यक निधी उपलब्ध करून घेण्यासाठी परिवहन विभाग आणि एसटी प्रशासनाने सातत्याने पाठपुरावा केला, ज्याला आता मोठे यश आले आहे.
प्रवासी सवलत प्रतिपूर्ती निधीचा मोठा आधार
एसटी महामंडळाच्या विविध प्रवासी सवलत योजनांपोटी शासनाकडून मिळणाऱ्या प्रतिपूर्तीच्या रकमेला महामंडळाच्या आर्थिक नियोजनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिकांसह विविध सामाजिक घटकांना दिल्या जाणाऱ्या प्रवासी सवलतींची अंमलबजावणी करताना महामंडळावर मोठा आर्थिक भार पडतो. या सवलतींच्या प्रतिपूर्तीपोटी निधी वेळेत उपलब्ध झाल्याने महामंडळाच्या आर्थिक व्यवहारांना मोठी गती मिळण्यास मदत होणार आहे.

"कर्मचाऱ्यांचे कुटुंब आनंदी ठेवणे आमचे कर्तव्य" – परिवहन मंत्री
या निर्णयाबाबत बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "एसटी ही केवळ एक परिवहन सेवा नसून महाराष्ट्रातील लाखो नागरिकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या सेवेला अहोरात्र कार्यरत ठेवणारे अधिकारी आणि कर्मचारी हेच महामंडळाचे खरे बळ आहेत. त्यांच्या कुटुंबीयांनाही दिवाळीचा सण आनंदाने साजरा करता यावा, ही आमची प्रामाणिक भूमिका आहे. दिलेला शब्द पाळण्याच्या दिशेने शासनाने हा निधी मंजूर केला असून, आता एसटी प्रशासनाने वेतन वितरणाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी."













