चिपळूण : कामगिरीवर काढलेल्या जिल्हा परिषद शिक्षकांची मूळ शाळेत जाण्यासाठी धडपड

चिपळूण : जिल्हा परिषद शिक्षण विभागात सध्या बदल्यांचा हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे कामगिरीवर काढलेल्या शिक्षकांना त्यांच्या मूळ शाळेवर परत जाण्याची घाई आहे. त्यासाठी अनेक शिक्षकांनी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील कामगिरीवर काढलेले ५६ शिक्षक मूळ शाळेत जाण्यासाठी धडपड करीत आहेत.

चिपळूण तालुक्यात एकूण ३१६ शाळा आहेत. दहा विद्यार्थी संख्या असलेल्या एकूण ७० शाळा आहेत. मागील वर्षभरात २२ शिक्षक सेवानिवृत्त झाले, तर पाच शिक्षकांनी जिल्हा बदली करून घेतली, तर काही शिक्षकांनी एका शाळेतून दुसऱ्या शाळेत बदली करून घेतली. अशावेळी ज्या शाळांमध्ये शिक्षक कमी होते, तिथे कामगिरीवर शिक्षक पाठविण्यात आले. तालुक्यात एकूण ५६ शिक्षक कामगिरीवर आहेत. शिक्षण विभागाने कामगिरीवर काढल्यानंतर शिक्षकांना ती नाकारता येत नाही.

संघटना किंवा राजकीय दबाव असला तरच एखाद्याची कामगिरी रद्द करता येते किंवा नियुक्तीच्या ठिकाणी काम करण्यात रस नसेल तर कामगिरी घेऊन आपल्या आवडीच्या ठिकाणी शिक्षक कामासाठी जातात, मात्र एप्रिलमध्ये बदलीच्या हंगामात कामगिरीवर गेलेले शिक्षक पुन्हा आपल्याला मूळ शाळेत परत येण्यासाठी प्रयत्न करतात.

ज्या शाळांत कमी पटसंख्या आहे तेथे एक शिक्षक असेल तर तेथील व्यवस्थेवर ताग येतो. शिक्षकाने शिकवायचे की शासनाकडून येणाऱ्या इतर जबाबदाऱ्या सांभाळायच्या असा प्रश्न येतो. दोन शिक्षक असेल तर मुलांना शिकवून उर्वरित कामे करता येतात. तालुक्यात ज्या ठिकाणी दोन शिक्षकांची नेमणूक केली आहे. तेथे एका शिक्षकाच्या कामगिरीवर दुसऱ्या शाळेत नेमणूक केली आहे. नाईलाजाने कामगिरी स्वीकारलेले शिक्षक आपल्या मूळ शाळेत परत जाण्यासाठी प्रयत्न करतात. एप्रिल आणि मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या होतात, याच दरम्यान आपल्याला मूळ शाळेत परत पाठवणेसाठी काही शिक्षकांकडून अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर केला जात आहे.

शिक्षकांची एकूण संख्या आणि शाळांवर आवश्यक असलेल्या शिक्षकांची संख्या याचा ताळमेळ बघून शिक्षकांच्या नेमणुका आणि बदल्या केल्या जातील. त्यामध्ये पूर्णपणे पारदर्शकता असेल, कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करायच्या नाहीत हे जिल्हा परिषदेचे धोरण आहे. शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही. रजेवर असल्यामुळे बदलीसाठी किती अर्ज आले आहेत, त्याची माहिती नाही – दादासाहेब इरनाक, गटशिक्षणाधिकारी, चिपळूण

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:35 AM 22/Apr/2025