हर्णे बंदरात एलईडी मासेमारी नौकांचा धुमाकूळ

दापोली : याआधी एलईडी मासेमारी नौकांवर कारवाई झाली असली तरी जिल्ह्यात एलईडी मासेमारी काही पूर्णतः बंद झालेली नाही, असे दिसत आहे. सोमवारी रात्री दापोली तालुक्यातील हर्णे बंदरासमोर एलईडी दिव्यांचा मोठा प्रकाशझोत येथील स्थानिक मच्छिमारांना दिसला. या बाबत मत्स्य विभागाकडून कोणतीही कारवाई दिसून आली नाही. त्यामुळे मत्स्य विभाग करतोय काय, असा संतप्त सवाल येथील स्थानिक मच्छिमार शासनाला विचारत आहेत.

शासनाने अवैधरित्या मासेमारी करणाऱ्या नौकांना रोखण्यासाठी स्पीड बोटी दिल्या आहेत. मात्र अशा वेळी मत्स्य विभागाची स्पीड बोट गेली कुठे, असा संताप देखील मच्छिमार बांधवांकडून व्यक्त होत आहे. मत्स्यविकास मंत्री नीतेश राणे यांनी मंत्रीपदाची सुत्रे हाती घेतल्यापासून मच्छिमार बांधवांसाठी काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. याचा फायदा हा मच्छिमार यांना होताना दिसत आहे. असे असूनही अवैधरित्या होणारी मासेमारी रोखण्यास मत्स्य विभाग अपयशी ठरताना दिसत आहे.

दिवसेंदिवस वाढत्या अवैध एलईडी, पर्ससीन मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार यांना मत्स्यदुष्काळाला सोमोरे जावे लागत आहे. आशा मासेमारीवर वेळीच कारवाई न केल्यास भविष्यात मोठा धोका निर्माण होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या नौका तळागाळातील मासे घेवून जातात हे असेच सुरू राहिल्यास स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ येईल, अशा प्रतिक्रिया मच्छीमारांतून उमटत आहेत. एलईडी मासेमारीविरोधात कडक कारवाईचे आदेश मत्स्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. तरीही एलईडी नौकाधारक मत्स्य विकास मंत्र्यांच्या भूमिकेलाच आव्हान देत असल्याने सर्वसामान्य मच्छीमारांनी दाद मागायची तरी कुणाकडे, असा सवाल मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:34 AM 24/Apr/2025