कोकण किनारपट्टीवर आधुनिक गस्ती नौका – मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे आश्वासन

दापोली : ज्याप्रमाणे अवैध मासेमारी रोखण्यासाठी जशी ड्रोनची नजर आहे, त्याप्रमाणे किनाऱ्यावर शिस्त राहावी, यासाठी लवकरच संपूर्ण किनारपट्टीवर आधुनिक गस्ती नौका आणल्या जातील, असे मत्स्यविकास मंत्री नितेश राणे यांनी दापोली येथे बोलताना सांगितले. ना. राणे हे दि. २५ रोजी दापोली दौऱ्यावर आले असता त्यांनी हर्णे जेटीची पाहणी केली, त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी होते.

कोकण किनारपट्टीवर एलईडी मासेमारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राणे यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी एलईडी मासेमारी होत असेल अशा ठिकाणीच्या जर तक्रारी आल्या आणि याचाबत अधिकारी जर कारवाई करत नसतील, तर अधिकाऱ्यांवर कडक अॅक्शन घेतली जाईल.

किनारपट्टीवर बाहेरील नौका येऊन मासेमारी करतात याबाबत कारवाई होत नाही, मात्र स्थानिक मच्छीमारांना अधिकारी त्रास देतात, याबाबत राणे यांनी कडक भूमिका घेत स्थानिक मच्छीमार यांना नाहक त्रास देण्याचा प्रयत्न होत असेल तर अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांना दम भरला आहे.

या किनाऱ्यावर बाहेरून येणाऱ्या बोटींबाबत माहिती घेऊन त्यानंतर कारवाईची पावले उचलली जातील, असेदेखील राणे म्हणाले. एलईडी मासेमारीला आपल्या इकडे परवानगी नाही. त्यामुळे ही मासेमारी १२ नॉटिकल माईलच्या बाहेर केली जाते, तर पारंपरिक मच्छीमारांसाठी या किनाऱ्यावर मासे मारी करण्यास मुभा आहे. विकास आणि सागरी सुरक्षा हे दोन महत्त्वाचे विषय घेऊनच आम्ही काम करत आहोत, असे ना. नितेश राणे यावेळी म्हणाले.

Ratnagiri Khabardar add image

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 AM 26/Apr/2025