रत्नागिरी : नव्या संचमान्यतेचा ग्रामीण शाळांना फटका

रत्नागिरी : शासन निर्णयानुसार २०२४-२५ ची संचमान्यता जाहीर झाली असून, त्यामध्ये १५ मार्च २०२४ च्या निकषानुसार जिल्ह्यातील ५७ माध्यमिक शाळा शून्य शिक्षकी आहेत. या संचमान्यतेमुळे ग्रामीण भागातील शाळांचे आणि त्यातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आले आहे.

शासनाच्या निकषानुसार २०२३-२४ च्या संचमान्यतेमुळे पाचवी आणि सहावी ते आठवी या वर्गांना पटसंख्येनुसार तर नववी व दहावी या दोन वर्गांनी मिळून किमान तीन शिक्षक मंजूर होते; पण २०२४-२५ च्या संचमान्यतेच्या निकषात प्रत्येक वर्गात किमान २० पटसंख्या असेल तर शिक्षक मंजूर होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक लहान शाळा शून्य शिक्षकी किंवा एकशिक्षकी झाल्या आहेत. याबाबतचे पत्र जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी शाळांना पाठवले आहे.

शासननिर्णय २८ ऑगस्ट २०२५ मध्ये दुरुस्ती करून ८ जानेवारी २०१६ नुसार नववी-दहावी या वर्गासाठी किमान ३ पदे मंजूर होती. त्यामुळे ग्रामीण भागातील छोट्या शाळांमध्ये किमान तीन शिक्षक उपलब्ध होत होते; परंतु १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार नववी तसेच दहावीमध्ये २० विद्यार्थीसंख्या असेल तरच शिक्षकपदे मंजूर होणार आहेत अन्यथा नववी-दहावी गटासाठी कोणतेही शिक्षकपद मंजूर होणार नाही.

बहुतांश ग्रामीण भागातील माध्यमिक शाळांमध्ये नववी-दहावीमध्ये विद्यार्थीसंख्या ४० पेक्षा कमी आहे. अशा सर्व शाळांमध्ये एकही पद मंजूर न झाल्याने संस्थाचालकांवर शाळा बंद करण्याची वेळ आली आहे.

नव्या संचमान्यतेला विरोध
राज्यातील सर्व संघांचा विरोध असतानाही प्रशासनाने २०२४-२५ ची संचमान्यता निश्चित केली. त्यामुळे जिल्ह्यातील काही माध्यमिक शाळा शून्यशिक्षकी होत आहेत. त्यामुळे या संचमान्यतेला विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समिती अध्यक्ष आयुब मुल्ला, सचिव सागर पाटील यांनी सांगितले. त्या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन चर्चा करण्याचे ठरले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 26/Apr/2025