वाढत्या तापमानामुळे ‘सनबर्न’चा धोका

रत्नागिरी : एप्रिल महिन्याच्या पंधरवड्यापासून उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली आहे. सकाळी ११ वाजल्यापासूनच प्रखर उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. या उन्हात १० ते १५ मिनिटे राहिले तरी सनबर्न होण्याचा धोका निर्माण होतो, असा इशारा त्वचारोग तज्ज्ञांनी दिला आहे.

ऊन चटके देणारे असतानाच त्यात असलेली अतिनील (यूव्ही) किरणे त्वचेसाठी घातक ठरतात. विशेषतः दिवसभर बाहेर काम करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा फटका बसतो. शेतकरी, हातमजूर, वाहनचालक, पोलिस कर्मचारी आणि रस्त्यावर विक्री करणारे विक्रेते यांना सनबर्नचा अधिक त्रास जाणवतो. त्वचेवर जळजळ, लाली आणि सूज, चट्टे पडणे किंवा त्वचा सोलटणे, काही वेळा ताप येणे आणि अशक्तपणा जाणवणे ही सनबर्न होण्याची लक्षणे आहेत. उष्माघाताचा धोकाही यामुळे वाढला आहे.

रत्नागिरी शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागातील तापमान ४० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. यामुळे त्वचेशी संबंधित विविध आजार होण्याची शक्यता आहे. काळजी घेणे गरजेचे आहे.

काय करावे?
सकाळी ११ ते संध्याकाळी ४ या वेळेत शक्यतो बाहेर जाणे टाळा. घराबाहेर पडताना संपूर्ण अंग झाकणारे सुती कपडे घालावेत. दर्जेदार सनस्क्रीनचा वापर करावा. चेहरा व हात झाकण्यासाठी कापडी मास्क स्कार्फ वापरावे.

हायड्रेटेड राहा!
दर दीड तासाने पाणी प्यावे. ताज्या फळांचा रस, नारळपाणी, लिंबूपाणी, ताक यांचा समावेश करावा, जीवनसत्त्व व खनिजयुक्त संतुलित आहार घ्यावा, धूम्रपान टाळा, त्वचेसाठी औटऑक्सिडंटयुक्त पदार्थांचा समावेश करावा, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

सनबर्न म्हणजे काय?
सूर्याच्या अतिउष्ण किरणांमुळे त्वचेवर थेट परिणाम होतो. त्यातून त्वचेवर खाज आणि लालसरपणा, जळजळ, वेदना आणि अस्वस्थता, काही वेळा पुरळ आणि सूज, गंभीर स्थितीत ताप, मळमळ, उलट्या अशी लक्षणे दिसून येतात, असे तज्ज्ञांनी सांगितले.

सध्या तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वातावरणात चांगलाच उष्मा निर्माण झाला आहे. सततच्या बाढत्या तापमानामुळे ‘सनबर्न ‘ची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे दुपारी अत्यावश्यक असेल तरच आवश्यक ती खबरदारी घेऊन बाहेर पडावे, अन्यथा उन्हात फिरू नये-डॉ. अभिजित देसाई, रत्नागिरी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:47 PM 26/Apr/2025