खेड : कोकणातील ग्रामीण भागात बेसुमार वणवा आणि जंगलतोड यामुळे पर्यावरणावर भीषण परिणाम होत असून, सध्या तापमान ५० अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याचे भासत आहे, असे प्रतिपादन डॉ. सतीश कदम यांनी पत्रकार परिषदेत केले. येत्या पाच-सहा वर्षांत जर आपण कठोर पावले नाही तर पंचमहाभूतांतील असंतुलनामुळे भूकंप, वादळ यांसारखे नैसर्गिक संकटे उद्भवतील, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली.
खेड येथे डॉ. सतीश कदम यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी ते म्हणाले, दि.१९ एप्रिल २०२५ रोजी महाळुंगे येथील मास्तर फार्ममध्ये संशयित समाजकंटक बबन शंकर महाडिक याने मुद्दाम वणवा लावून सुमारे पाच एकर बागेतील विविध फळझाडे जाळून टाकली. यामध्ये काजू, आंबा, चिकू, नारळ, लिंबू, चंदन यांसह गावातील देवाचं पवित्र झाडही नष्ट झालं. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्याकडे याबाबत तक्रार केली असून, संशयिताच्या विरोधात अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही. पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्याविरोधात कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
तसेच कोकण रेल्वे मार्गावर खेड रेल्वे स्टेशनपासून सिंधुदुर्गपर्यंत जी स्थानके आहेत येथील झाडांची देखील मोठ्या प्रमाणावर कत्तल झाल्याचे दिसत आहे. ही झाडे तोडण्याचा आदेश देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून झाडांचे संगोपन करण्याचा खर्च वसूल करावा.
कोकणातील ८५ गावे ‘इको सेन्सिटिव्ह झोन’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. मात्र जंगल माफिया पासून या भागाचे संरक्षण करण्याची जबाबदारी तालुका प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांनी घेणे आवश्यक आहे. याबाबत तातडीने उपाययोजना करण्याची विनंतीही डॉ. सतीश कदम यांनी यावेळी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:36 AM 02/May/2025














