आरजीपीपीएलमध्ये ठेक्याची रक्कम रखडल्याने चालकांचे पगार थकले

गुहागर, 05 मे 2025 : गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस आणि वीजप्रकल्पात (आरजीपीपीएल) वाहन ठेकेदारीची तीन महिन्यांची रक्कम मिळाली नसल्याने 24 चालकांचे चार महिन्यांचे पगार थकले आहेत. यामुळे चालकांनी कामबंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आरजीपीपीएलमध्ये अधिकाऱ्यांसाठी ठेकेदारी पद्धतीने 15 वाहने घेण्यात आली आहेत. काही वाहने 24 तास कंपनीत असतात, त्यामुळे 24 चालक कार्यरत आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्यांना पगार मिळालेले नाहीत. हातावर पोट असलेल्या या चालकांनी पगार न दिल्यास कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठेकेदारांनी धावपळ सुरू करत थकीत रक्कम आणि इतर देणी त्वरित देण्याची विनंती केली.

समन्वयाचा अभाव : एका ठेकेदाराने सांगितले की, प्रकल्पात आरजीपीपीएल आणि एनटीपीसीच्या अधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा अभाव आहे. फाइल्समध्ये तांत्रिक त्रुटी काढल्या जात असल्याने रक्कम मंजुरी रखडते.

या समस्येमुळे चालकांमध्ये असंतोष वाढला आहे. प्रशासनाने तातडीने रक्कम मंजूर करून चालकांचे पगार देण्याची मागणी होत आहे. अन्यथा, प्रकल्पातील कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे, असे ठेकेदारांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:22 PM 06/May/2025