रत्नागिरी : चार महिन्यांत ५७ महिलांच्या नावे सदनिकेची खरेदी

रत्नागिरी : महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास राज्य सरकारकडून मुद्रांक शुल्कामध्ये एक टक्का सवलत दिली जाते. त्यांना नेहमीच्या मुद्रांक शुल्कापेक्षा १ टक्के कमी शुल्क भरावे लागते. गेल्या चार महिन्यांत रत्नागिरी जिल्ह्यातील ५७ महिलांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या नावावर घर खरेदी झाली आहे. त्यामुळे या महिला त्या घराच्या मालकीण झाल्या आहेत.

महिलांचा योग्य सन्मान राखण्यासाठी त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यासाठी महिलांच्या नावे सदनिका खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत देण्याचा निर्णय २१ मार्च २०२१ रोजी घेतला होता

आर्थिक वर्षात ३० हजार जणांनी केली दस्त नोंदणी
रत्नागिरी शहरात आता घरे बांधण्यासाठी जागा शिल्लक नाहीत. त्यामुळे रत्नागिरीच्या बाहेर असलेल्या जागांनाही आता मागणी वाढली आहे. सध्या रत्नागिरी शहरात फ्लॅट मिळणे अवघड झाले आहे. एप्रिल २०२४ ते मार्च २०२५ या कालावधीत ३० हजार दस्तांची नोंदणी करण्यात आली आहे.

महिलांचा सन्मान राखण्यासाठी सवलत
मालमत्तांची खरेदी महिलांच्या नावे फारच कमी होते. वडिलोपार्जित मालमत्तांमध्येही त्यांना हिस्सा कमी मिळतो. महिलांचा योग्य सन्मान करण्यासाठी तसेच त्यांना हक्काचा निवारा उपलब्ध होण्यासाठी शासनाने त्यांना मुद्रांक शुल्कात एक टक्का सवलत दिली आहे.

विक्रीची जाचक अटही रद्द
सवलत घेतलेल्या महिलेला दस्त नोंदणीपासून पंधरा वर्षे कालावधीपर्यंत कोणत्याही पुरुषाला घर विकता येत नव्हते. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थी महिलांना आर्थिक अडचणी आल्यास घरे विकता येत नव्हती. विकल्यास मुद्रांक शुल्क विभागाकडून दंड आकारण्यात येत होता. मात्र, आता या जाचक अटी शासनाने रद्द केल्या आहेत.

सवलत केवळ निवासी मालमत्तेसाठी लागू
महिलांसाठी मुद्रांक शुल्कात १ टक्के सवलत केवळ निवासी मालमत्तेसाठी लागू आहे, व्यावसायिक किंवा औद्योगिक मालमत्तेसाठी नाही.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:02 PM 08/May/2025