गुहागर : विद्यार्थासाठी १६ जूनपासून एसटी बस सेवा सुरु करण्याची मागणी

आबलोली : विद्यार्थ्यांना शाळा, कॉलेज सुटल्यानंतर वेळेत घरी जाता यावे यासाठी १६ जूनपासून एसटी बस सेवेच्या वेळेत बदल करावा अशा मागणीचे निवेदन येथील चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने गुहागरचे आमदार भास्कर जाधव तसेच गुहागर आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांना देण्यात आले.

गुहागर तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवी ते इयत्ता बारावीपर्यंतचे शिक्षण दिले जाते. याचा लाभ आजूबाजूच्या गावातील विद्यार्थ्यांनाही होतो. शिक्षणासाठी आबलोली परिसरातील ग्रामीण भागातून, अनेक गावातून विद्यार्थी येत असतात. या शाळेची वेळ सकाळी १०.१० ते सायंकाळी ४.१० अशी असून, शाळा सुटल्यावर बऱ्याच विद्यार्थ्यांना सायंकाळी ६ ते ६:३० पर्यंत आबलोलीतच थांबावे लागते. पर्यायाने त्यांचा रोजचा साधारणपणे दोन तासांचा वेळ वाया जातो.

त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांना वेळेत शाळेत येण्यासाठी सकाळी ८ वाजता गुहागरमधून पालशेतमार्गे तवसाळ व्हाया बाबरवाडी व तांबडवाडी मार्गे पडवे, काताळे, कुडली, सडेजांभारी, मासू, आबलोली व घरी जाण्यासाठी दुपारी साधारण ३ वाजता गुहागर आगारातून एसटी बस सोडण्यात यावी. ही बस सायंकाळी ४.१० वाजता आबलोली मार्गे मासू, सडेजांभारी, कुडली, पडवे, तवसाळ या मार्गावरून व्हाया बाबरवाडी व तांबडवाडी पर्यंत जाऊन परत गुहागर येथे जाईल. ही सेवा तात्काळ सुरू झाल्यास शिक्षणासाठी प्रवास करणाऱ्या आबलोली परिसरातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होईल व त्यांच्या वेळेची आणि पैशांची बचत होईल आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान थांबे.

याविषयात तातडीने लक्ष घालून या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी दिनांक १६ जून रोजी सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षापासून एसटी बस सेवा सुरू करण्यासाठी गुहागरचे आमदार भास्करशेठ जाधव यांना व रा. प. गुहागर आगार व्यवस्थापक श्री. चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. यावेळी लोकशिक्षण मंडळ आबलोली संचालित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय आबलोली यांचे वतीने दिनेश नेटके, अहिरे, राजेंद्र साळवी, सचिन बाईत, विलास गुरव, व्हनमाने आदी उपस्थित होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:16 AM 08/May/2025