साद शेख याला ‘राष्ट्रीय नृत्य भूषण बाल पुरस्कार’

चिपळूण : डायडाज इंटरनॅशनल डान्स स्कूल, चिपळूण येथील विद्यार्थी साद इमरान शेख याने अवघ्या १४ वर्षांच्या वयात ‘राष्ट्रीय नृत्य भूषण बाल पुरस्कार’ पटकावत रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण कोकणचा गौरव वाढवला आहे.

२९ एप्रिल २०२५ रोजी नागपूर येथे कल्चर फाउंडेशन ऑफ इंडिया आयोजित आंतरराष्ट्रीय नृत्य दिनानिमित्त भव्य राष्ट्रीय पुरस्कार सोहळा पार पडला. देशभरातून आलेल्या ३५० नामांकनांमधून सादची निवड झाली. विविध राज्यांतील नृत्यकलेतून अविस्मरणीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना गौरवण्यात आले.

साद इमरान शेख याला हा पुरस्कार कल्चर फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल आनंद सर आणि कार्याध्यक्ष भूपेश मेहेर सर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. साद हा रत्नागिरी जिल्हा, चिपळूण तालुका आणि संपूर्ण कोकणातील एकमेव कलाकार आहे, ज्याने एवढ्या लहान वयात असा राष्ट्रीय दर्जाचा पुरस्कार प्राप्त केला आहे.

हा पुरस्कार केवळ सादचा नसून संपूर्ण जिल्ह्यातील नृत्यप्रेमींसाठी अभिमानास्पद ठरतो. याआधी कोकण परिसरातील कोणत्याही विद्यार्थ्याला अशा प्रकारचा राष्ट्रीय सन्मान मिळालेला नाही.

सादची यशोगाथा थक्क करणारी आहे –

३ वेळा राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता

१ वेळा आंतरराष्ट्रीय सुवर्ण पदक विजेता

आणि तब्बल १४ वर्षांनंतर भारतासाठी साउथ एशियन डान्स स्पोर्ट्स चॅम्पियनशिप मध्ये सुवर्ण पदक मिळवून देणारा कलाकार

सादच्या या यशाची दखल घेऊन कल्चर फाउंडेशन ऑफ इंडिया तर्फे त्याला सन्मानित करण्यात आले.

या सोहळ्यात डान्स स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ इंडिया चे राष्ट्रीय सचिव तसेच डायडाज इंटरनॅशनल डान्स स्कूल चे संस्थापक श्री. सुरज विलास जाधव उपस्थित होते. त्यांनी सादचे विशेष कौतुक करत त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी सादच्या कष्टाबरोबरच त्याच्या पालकांच्या समर्पणाचेही विशेष उल्लेख करत त्यांचे अभिनंदन केले.

सादचा हा सन्मान कोकणातील उभरत्या कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 08-05-2025