रमेश कदम यांना ‘सन्माननीय सदस्य’ म्हणून गौरविणार; लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचा निर्णय

चिपळूण : येथील शतकोत्तर हिरक महोत्सवी परंपरा लाभलेल्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराचे ‘सन्माननीय सदस्य’ म्हणून माजी आमदार रमेश कदम यांना गौरविण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे.

येत्या रविवारी (दि. ११) वाचनालयाच्या वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याहस्ते होणार आहे. या कार्यक्रमात कदम यांना गौरविण्यात येणार आहे.

चिपळूणला वैचारिक अधिष्ठान देणारे लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिर आणि कदम यांचे अतूट नाते चार दशकांचे आहे. छत्तीस वर्षापूर्वी नगराध्यक्ष असताना १९८८ साली, संस्थेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहाची निर्मिती झाली. यामध्ये कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले होते. वाचनालयाच्या अप्पासाहेब साठे सभागृह, उषाताई साठे सभागृह आणि बुरुमतळी भागातील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांसाठीही कदम यांनी केलेले सहकार्य मोलाचे राहिले आहे. चिपळूण येथे संपन्न झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनापासून अखिल भारतीय नाट्य संमेलन आणि ८६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापर्यंत प्रत्येक वेळी कदम यांनी संस्थेचे घटक बनून राहिले होते. आजही त्यांच्या मनात लोटिस्माबद्दल आपुलकीची भावना आहे.

यापूर्वी दैनिक सागरचे संस्थापक-संपादक स्व. नानासाहेब जोशी, माजी लोकसभाध्यक्षा श्रीमती सुमित्रा महाजन, ज्येष्ठ साहित्यिक ‘कृषिभूषण’ डॉ. तानाजीराव चोरगे यांनाही वाचनालयाने आपले ‘सन्माननीय सदस्यत्व’ दिलेले आहे. ‘लोटिस्मा’च्या संचालक मंडळाने एकमताने घेतलेल्या सन्माननीय सदस्यत्व देण्याच्या निर्णयाला संमती दर्शवल्याबद्दल, ‘हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे’ असे लोटिस्मा संचालक मंडळाने म्हटले आहे. लोटिस्मा परिवाराबद्दलची कदम यांची आपुलकी आणि सहकार्य असेच अखंड राहील, असा विश्वास वाचनालयाचे कार्यवाह विनायक ओक, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, अध्यक्ष डॉ. यतीन जाधव यांनी व्यक्त केला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:57 08-05-2025