खरीप हंगामात भातखाचराच्या बांधावर तूर लागवडीतून आंतरपीक शक्य

रत्नागिरी : कोकणात तूर हे पीक प्रामुख्याने खरीप हंगामात भातखाचराच्या बांधावर घेण्यात येते. वरकस जमिनीवर सलग किंवा भात, नाचणी पिकांत आंतरपीक किंवा मिश्रपीक म्हणूनही ते घेण्यात येते. तूरपिकासाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी, मुळे खोलवर जाऊ शकणारी भुसभुशीत जमीन मानवते. खार व पाणथळ जमिनीत हे पीक चांगले येत नाही. पहिले पीक काढल्यानंतर जमीन योग्य वापरावर येताच खोल नांगरणी करावी आणि उन्हात चांगली तापू द्यावी. त्यामुळे जमिनीचे भौतिक, रासायनिक, जैविक गुणधर्म सुधारून उत्पादकता वाढण्यास मदत होते. नांगणीनंतर कुळवणी करून ढेकळे फोडावीत व फळी मारून जमीन समपातळीत आणावी.

तुरीमध्ये सुधारित जातीची शिफारस डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाने केली आहे. त्यामध्ये कोकण तूर १, आय.सी.पी.एल ८७, टी २१, विपुला या वाणांचा समावेश असून, ती किमान १२० ते १५५ दिवसांत तयार होते. हेक्टरी १० ते १८ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळते. पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रतिकिलो बियाण्यास २.५ ग्रॅम थायरम चोळावे व त्यानंतर २५ ग्रॅम रायझोबियम गुळाच्या थंड द्रावणात मिसळून लावावे.

तूरपिकाचा कालावधी तुलनात्मकदृष्ट्या इतर कडधान्य पिकापेक्षा जास्त असल्याने पेरणी नियमित पावसाळा सुरू होताच जून महिन्यात लवकरात लवकर करावी. कोकणात पेरणी उशिरा केल्यास बियांचा रुजवा योग्य प्रकारे होत नाही. तसेच उत्पादनात घट होते. सलग पीक घ्यावयाचे असल्यास हलक्या जमिनीत ६० सेंटीमीटर बाय ७५ सेंटिमीटर, तर मध्यम ते भाजीव जमिनीत ७५ सेंटिमीटर ते ९० सेंटिमीटर अंतरावर पेरणी करावी. वाणाचा कालावधी व पेरणी अंतरानुसार हेक्टरी १५ ते २० किलो बियाणे लागते.

तुरीच्या सलग पिकासाठी हेक्टरी २५ किलो नत्र, ५० किलो स्फुरद व आवश्यकतेनुसार ५० किलो पालाश पेरणीच्यावेळी बियाण्याच्या खाली मातीत चांगले मिसळून द्यावे. पेरणीनंतर दहा दिवसांत नांगे भरावेत. तसेच आवश्यकता असल्यास विरळणी करावी. पिकात १५ ते २० दिवसानंतर कोळपणी करावी; तसेच एक ते दोन बेणण्या करून पीक ४५ ते ६० दिवसांचे होईपर्यंत शेत तणविरहित ठेवावे. तूर खरीप हंगामातील पीक असल्याने ते पावसाच्या पाण्यावर वाढते. पावसामध्ये जास्त काळ खंड पडल्यास सिंचन सुविधा उपलब्ध असेल तर पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षित पाणी दिल्यास उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तूर तूर लागवडीचे योग्य व्यवस्थापन केल्यास हेक्टरी १२ ते १५ क्विंटल उत्पादन मिळते.

Hotel waiter

पीक संरक्षण
पीक फुलोऱ्यात आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना शेंगा पोखरणारी अळी, पिसारी पतंग, शेंगावरील माशी व काळे सोंडे या किडीमुळे ३० ते ४० टक्के नुकसान होते. या किडींचे नियंत्रण एकात्मिक कीड व्यवस्थापनाने करावे. आधीच्या पिकानंतर खोल नांगरणी, निंबोणी पेंड, सेंद्रिय खते, पिकांची फेरपालट, आंतरपिके, मिश्रपिके, रासायनिक उपायांचा एकात्मिक वापर केल्यास किडींचे प्रमाण कमी राहते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:07 PM 08/May/2025