विविध मागण्यांसाठी खेडमध्ये कृषी सहायकांचे आंदोलन

खेड : कृषी सेवकांना नियमित पदोन्नती, पदनाम बदल, डिजिटल सुविधा आणि निविष्ठा वाटपातील त्रुटी दूर करण्यासह विविध मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज दिनांक ७ मे रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, खेड येथे आंदोलनाचा तिसरा टप्पा पार पडला. यावेळी तालुका कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी करत कृषी सहायकांनी धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटना, शाखा खेड यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन उभे राहिले असून मागण्या मान्य होईपर्यंत टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू राहणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

कृषी सेवकांचा कालावधी रद्द करून त्यांना थेट कृषी सहाय्यक पदावर नियुक्ती द्यावी, कृषी सहाय्यक या पदाचे नामांतर सहाय्यक कृषी अधिकारी करावे, डिजिटल युगातही लॅपटॉपपासून वंचित असलेल्या कृषी सहाय्यकांना तातडीने लॅपटॉप वितरित करावेत, ग्रामस्तरावरील कामासाठी कृषी मदतनीस उपलब्ध करून द्यावेत,

निविष्ठा वाटपात नियोजनशून्यता असून, त्यासाठी वाहतूक भाड्याची तरतूद करावी किंवा परमिट प्रणाली लागू करावी; अन्यथा खरीप २०२५ मध्ये निविष्ठा वाटपावर बहिष्कार टाकण्यात येईल, कृषी विभागाच्या आकृतीबंधाला तातडीने मंजुरी देऊन पदोन्नतीतील अडथळे दूर करावेत, पोकरा योजनेतील समूह सहाय्यकांची पदे पूर्ववत भरावीत, एमआरइजीएस योजनेंतर्गत लक्ष्य ठरवताना स्थानिक अडचणींचा विचार करावा, नैसर्गिक आपत्तीनंतरच्या पंचनाम्यांबाबत स्पष्ट कार्यपद्धती ठरवावी, सिल्लोडमधील आत्महत्येप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, कृषी सहाय्यक आस्थापनासंदर्भातील संवर्गाच्या अडचणी तातडीने सोडवाव्यात आदी प्रमुख मागण्या आहेत.

या आंदोलनात दि. ८ रोजी एकदिवसीय सामूहिक रजा आंदोलन करण्यात आले. दि.९ रोजी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे तर दि.१५ मेपासून बेमुदत कामबंद आंदोलनाची हाक संघटनेने दिली आहे. शासनाकडे मागण्यांकडे गांभीयनि लक्ष देण्याची मागणी केली असून, अन्यथा संपूर्ण कृषी यंत्रणा ठप्प होण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:03 AM 09/May/2025