पर्यटनाचा मानबिंदू : तावडे अतिथी भवन

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाच्या आडिवरे (ता. राजापूर) येथील तावडे भवनाचा सातवा वर्धापनदिन १० व ११ मे रोजी मोठ्या दिमाखात साजरा होत आहे. तसेच याच आवारात कुलदैवत श्री सप्तकोटेश्वराचे सुरेख मंदिर उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमीपूजन दि. १० मे रोजी होणार आहे. तावडे भवनाच्या सात वर्षांच्या वाटचालीविषयी थोडक्यात…

श्री. संतोष तावडे,
आर्किटेक्ट, तावडे अतिथी भवन

क्षत्रिय मराठा तावडे हितवर्धक मंडळाने २०१५ मध्ये तावडे भवनाच्या बांधकामास प्रारंभ केला. आडिवरे येथे दीड एकरवर दहा हजार चौरसफुटांचे बांधकाम, बेसमेंटसह तीन मजली चिर्‍याच्या भिंती, मेंगलोरी कौलांचे छप्पर असलेली ही वास्तू कोणाच्याही नजरेत भरणारी आहे. येथे तावडे यांचे कुलदैवत श्री सप्तकोटेश्‍वराची विशाल मूर्ती स्थानापन्न केली आहे. या ठिकाणी आलिशान असे आठ एसी सूट्स, उद्यान, पार्किंगसाठी प्रशस्त जागा आहे. आता तावडे वाड्याचा दुसरा टप्पा सुरू होत असून यात प्रथम श्री सप्तकोटेश्वराचे मंदिर उभारण्यात येणार आहे.

तावडे हे राजस्थानच्या राजपूत घराण्याचे वंशज. आडिवरे येथे ८०० वर्षांपूर्वी तावडे घराण्याची वस्ती होती. आडिवऱ्याच्या श्री महाकाली मंदिरातही त्यांचा मान आहे. कोकणातून बाहेरगावी गेलेले तावडे कुटुंबिय पुन्हा आपल्या गावात येतात. त्यामुळे तावडे भवनाला अधिक महत्त्व प्राप्त झाले. तावडे घराण्याचे ऐतिहासिक महत्त्व लक्षात येण्याकरिता ही वास्तू जांभ्या दगडात व राजस्थानी वाड्याप्रमाणे उभारली आहे.

गेल्या सात वर्षांची वाटचाल पाहता तावडे भवनाला तावडे कुटुंबिय आणि पर्यटकांनी पहिली पसंती दिली आहे. येथे कुलदैवत श्री सप्तकोटेश्वर असल्यामुळे भवनात फक्त शाकाहारास परवानगी आहे. अन्य गैरमार्गांना येथे परवानगी नाही. मुंबई- गोव्याच्या मध्यवर्ती असल्याने या वाड्याचे ऑनलाइन व ऑफलाइन आरक्षण बऱ्याचदा फुल्ल असते. या ठिकाणी मुंबई, पुणे, कर्नाटक, दिल्ली, कोल्हापूर, सोलापूर यासह युएस, युके, ऑस्ट्रेलिया, पोर्तुगाल या परदेशांमधीलही पर्यटक आवर्जून येऊन गेले आहेत. तसेच सायकल, बाईक व महिलांचे ग्रुपही मोठ्या प्रमाणावर येत असतात. शांत व अतिशय प्रसन्न असणाऱ्या या वाड्यात एकाच वेळेस २५० ते ३०० लोकांची बसण्याची व्यवस्था असल्याने मुंज, साखरपुडाही येथे केला जातो. लग्न व इतर मोठ्या कार्यक्रमांसाठी शेजारी मोठे स्टेज असून त्या ठिकाणी साधारण १२०० लोक बसतील एवढी सोय आहे.

तसेच विविध कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, मान्यवरांच्या बैठका, सेमिनार, वर्कशॉप्सही येथे आयोजित केली जातात. डेस्टिनेशन वेडिंगसाठी हा स्पॉट आता प्रसिद्ध होऊ लागला आहे. गणपतीपुळे ते मालवणच्या बरोबर मध्यावर असलेले तावडे भवन शिवाय देवघळी बीच, कशेळीतील हजार वर्षे जुने श्री कनकादित्य मंदिर, आडिवरे येथील प्रसिद्ध श्री महाकाली मंदिर, पावस येथील स्वामी स्वरूपानंद मंदिर, गणेशगुळे येथील श्री गणेश मंदिर अशा विविध पर्यटनस्थळांच्या नजीक असल्यामुळे तावडे भवनाला पर्यटकांनी राहण्यासाठी पसंती दिली आहे.

भवनातील प्रशस्त खोल्यांमध्ये, एका खोलीत एका वेळेस चार ते पाच जणांचे कुटुंब राहू शकते. स्वच्छता, नीटनेटकेपणा, नम्र, तत्पर कर्मचारी वर्ग, कामगार, यामुळे या ठिकाणी पर्यटकांना तत्काळ सेवा मिळते. शिवाय सुरक्षित वातावरण, चांगली वागणूक, सकारात्मक उर्जा अनुभवायला मिळते. शुद्ध शाकाहारी व पौष्टिक जेवणलाही पसंती मिळते. तावडे भवनाच्या ऐतिहासिक लुक पाहिल्यानंतर येथे फोटो शूट, चित्रीकरणासाठीही अनेकांना भुरळ पडली आहे. स्वीमिंग पूल, रूम आणि इनहाऊस वर्किंग किचन अशा सोयी करण्याची मागणी पर्यटकांकडून नेहमीच होत असते.

तावडे भवनाच्या या वाटचालीत आजवर अनेक मान्यवर, दिग्गजांनी वाड्याला भेट देऊन कौतुक केले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तावडे भवनास भेट देऊन विशेष कौतुक केले होते. तसेच सुप्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन-लघाटे यांचे या भवनात चित्रीकरण झाले आहे. काही टीव्ही मालिकांचे चित्रीकरणही झाले आहे. आमदार, मंत्री यांच्यासह, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलिस अधीक्षक, जिल्हा न्यायाधीश आदींनीही भेटी दिल्या आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:09 09-05-2025