लांजा, दि. १० मे २०२५: तालुक्यातील शिपोशी हनुमानवाडी येथे काल, दि. ९ मे २०२५ रोजी दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास एका ६५ वर्षीय वृद्धाला लोखंडी शिगेने मारहाण करून जखमी करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी लांजा पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ११८(१), ३५२ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी शांताराम शंकर ड्रागडे (वय ६५, रा. शिपोशी हनुमानवाडी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या जागेत उद्या येणाऱ्या वाळूच्या गाडीसाठी रस्ता साफ करत होते. त्याचवेळी आरोपी अजय तुकाराम झगडे (वय ४०, रा. शिपोशी हनुमानवाडी) याची पत्नी रेशन दुकानावरून घरी येत असताना त्यांना पाहून घरी गेली. तिने आपल्या पतीला काहीतरी सांगितल्यानंतर अजय झगडे याने घरातून लोखंडी शिग घेऊन फिर्यादींवर हल्ला केला. फिर्यादी त्यांच्या घरामागे लाकडे भरत असताना अजयने त्यांच्या डाव्या मांडीवर लोखंडी शिगेने जोरदार प्रहार केला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. यावेळी आरोपीने शिवीगाळ करत “ठार मारून टाकतो” अशी धमकीही दिली.
या घटनेनंतर फिर्यादी शांताराम ड्रागडे यांनी लांजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून गुन्हा दाखल केला असून, आरोपी अजय झगडे याच्याविरुद्ध तपास सुरू केला आहे. ही घटना दि. ९ मे २०२५ रोजी सायंकाळी ७:३४ वाजता पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली असून, गुन्हा क्रमांक ९५/२०२५ अंतर्गत कारवाई सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:11 10-05-2025
